ताज्या घडामोडी

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीनेएनपीएस हटावच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे लक्षवेधी आंदोलन आरंभ

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

अंशदायी पेन्शन योजना NPS रद्द करुन सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने शासनाचे मागणी संदर्भात लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी यांचेकडून सोमवार दि.21/11/2022 पासून लक्षवेधी आंदोलनास सुरुवात करण्यात आली असून हे आंदोलन दिनांक 25/11/2022 पर्यंत भोजनाच्या सुट्टीत जिल्हाधिकारी कार्यालय परीसरातील संघटनेच्या कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभुमिवर NPS बाबत विचारविनीमय करुन योग्य निर्णय घेण्यासाठी शासनाने सकारात्मक विचार करुन अर्थराज्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली दि. 21/01/2019 रोजी अभ्यास समितीची स्थापना केली. या समितीच्या दोन किंवा तीन बैठका संपन्न झाल्या परंतु मागील साडेतीन वर्षाचा कालावधी लोटून सुध्दा राज्यातील NPS धोरणा संदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे राज्यातील कर्मचारी शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष आहे. सामाजिक सुरक्षेसाठी नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी परिभाषित पेन्शन योजना सर्वांना लागू करणे हिताचे आहे. अशी सरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची धारणा आहे. अलीकडेच राजस्थान, छत्तीसगड, गोवा, झारखंड या राज्यांनी तेथील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी परीभाषित पेन्शन योजना लागू केली. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असल्याने वरील राज्यांप्रमाणे NPS बाबतचे सुधारीत धोरण महाराष्ट्र राज्यात लागू करावे याकरीता या लक्षवेधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे दिपक जेऊरकर यांनी आमचे प्रतिनिधीस आज सांगितले.
सदरहु आंदोलनातील उपस्थित कर्मचाऱ्यांना दिपक जेऊरकर व राजु धांडे यांनी मार्गदर्शन केले तर संदीप ठाकरे, श्रीकांत येवले, प्रशांत कोशटवार आदीं संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.उपरोक्त आंदोलन दि.21/11/2022 ते दि.25/11/2022 या कालावधीत दुपारी 2.30 वाजता दररोज जिल्हाधिकारी कार्यालय परीसरातील संघटनेच्या कार्यालयासमोर करण्यात येणार असून जिल्हा तथा तालुकास्तरावरील सर्व शासकीय-निमशासकीय कर्मचारी व अधिकारी यांनी उत्स्फुर्तपणे मोठ्या
संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close