स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने आदर्श ग्राम कोटगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
तब्बल ७५ रक्तदात्यांची नोंदणी,४२ रक्तदात्यांचे रक्तदान
जि. प. शाळा कोटगाव तथा ग्रामपंचायत कोटगावचा स्तुत्य उपक्रम
तालुका प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे नागभीड
नागभीड तालुक्यातील आदर्श ग्राम कोटगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोटगाव व ग्रामपंचायत कोटगाव यांच्या वतीने १९ ऑक्टोबर ला करण्यात आले. दिवसेंदिवस पडणारा रक्ताचा तुटवडा ,रक्तपेढीवर पडणारा ताण, कोरोना काळात झालेली जीवितहानी ,तसेच समाजात ग्रामीण भागात रक्तदानाची चळवळ उभी रहावी या उदात्त हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन करून नवा आदर्श कोटगाव वासीयांनी प्रस्थापित केला असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि.प .सदस्य संजय गजपुरे यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाचे उदघाटक माजी जि. प. उपाध्यक्ष ॲड.गोविंद भेंडारकर यांनी शहरांपेक्षा ग्रामीण भागात राबविलेल्या रक्तदान शिबिराचे भरभरून कौतुक करून स्वगावी राबविलेल्या रक्तदान कार्यक्रमाचा अभिमान असल्याचे मत व्यक्त केले.
या रक्तदान शिबिरात तब्बल ७५ रक्तदात्यांनी नाव नोंदणी केली ,परंतु रक्तदानाचे निकष पूर्ण न केल्याने ४२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व पार पाडले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे, उदघाटक माजी जि. प. उपाध्यक्ष ॲड. गोविंद भेंडारकर ,कार्यक्रमाचे मार्गदर्शक नागभीडचे गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी,शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता भंडारे,केंद्रप्रमुख प्रमोद नान्हे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभवी काटेखाये,डॉ. ममता पत्रे, कोटगावचे सरपंच सुनील वाघ, उपसरपंच यशवंत भेंडारकर,शाळा समितीचे अध्यक्ष सतीश मेश्राम,कृषक विद्यालय कोटगाव च्या मुख्याध्यापिका छायाताई मरघडे ,ग्रामसेविका वैशाली ढोरे,तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी रक्तदान हे महादान असून आपल्या रक्ताने एखाद्याचे प्राण वाचू शकते, त्यामुळे आपण रक्तदान करून सामाजिक दायित्व पार पाडावे असे आवाहन मान्यवरांनी केले.सर्व रक्तदात्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव पांडव, उपकेंद्र कोटगाव च्या वतीने सर्व रक्तदात्यांची हिमोग्लोबिन ,रक्तगट,रक्तदाब,शुगर तपासणी करण्यात आली.आरोग्य अधिकारी डॉ. वैभवी काटेखाये यांचे वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचा भेटवस्तू देऊन याप्रसंगी सन्मान करण्यात आला. “ स्वछता ही सेवा “ या उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना ग्रामपंचायत कोटगाव च्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील युवक,आशा सेविका,अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत यांनी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल कळंबे यांनी आभार योगीराज कुळे यांनी मानले.