आशा गटप्रवर्तकांना किमान वेतन द्या
उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील नवीन १०० खाटांचे रुग्णालयाला निधी उपलब्ध करा.
खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी.
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक प्रभावी असावी, समाजातील शेवटच्या घटकाला उत्तम आरोग्य व्यवस्था मिळण्यासाठी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर नेहमीच आग्रही असतात. आज जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेविषयी विविध समस्या तात्काळ निकाली काढण्याचे दृष्टीने लोकहितकारी मागण्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्यापुढे मांडल्या, त्यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेणार असल्याची ग्वाही मंत्री महोदयांनी दिली आहे.
आरोग्य व्यवस्थेचा दूत म्हणून आशा स्वयंसेविका काम करीत असतात. परंतु त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे आज मंत्री महोदयांची भेट घेऊन खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आशा स्वयंसेविकेच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली. त्यात आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे वाढीव मानधन एप्रिल महिन्यापासून थकीत आहे, ते तात्काळ देण्यात यावे. तसेच दरमहिन्याला देण्याची तरतूद करावी. तसेच केंद्र शासनाचे दि. ६ डिसेंबर २०२१ च्या सुधारित आदेशानुसार ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२ कोविड प्रोत्साहन भत्ता एक हजार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना ५०० रुपये देण्याचा निर्णय असताना अद्याप अनेकांना मिळाले नाही. ते तात्काळ देण्यात यावे. आरोग्यवर्धिनी अंतर्गत इसेटिव्ह मासिक मोबदला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, मूल तालुक्यासह इतरही काही ठिकाणी थकीत आहे ते त्वरित द्यावे व त्यांना आरोग्य विभागात सामावून घेऊन किमान वेतन द्या अशा विविध मागण्या आज मंत्रीमहोदय समोर ठेवल्या. काही दिवसातच या निकाली काढण्याची ग्वाही त्यांनी दिली.
त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा हे मोठे शहर आहे. येथे कोळसा खाणी व इतर उदयॊगात मोठया प्रमाणात कामगार काम करतात. परंतु आरोग्याचा सोई सुविधांच्या अभावामुळे अनेकांचे प्राण जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे या शहरात अद्यावत रुग्णालय देण्याची मागणी त्यावेळी तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांनी केली होती. ५० खाटांवरून १०० खाटांचे रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धक करण्यात आले. जागे अभावी रुग्णालयाचे बांधकाम रखडले असून नवीन जागेवर बांधकामाकरिता ५९ कोटी ७१ लक्ष ५४ हजार निधीचे एस्टिमेट आहे. तरी वरील निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ती देखील तात्काळ देण्याचे मंत्री महोदयांनी मान्य केले. वरील सर्व मागण्या मान्य झाल्यास लाखो रुग्णांना लाभ होणार आहे. पुढे देखील सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करून मार्गी लावण्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिली आहे.