परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे श्रीरामनवमी उत्सव
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी येथील परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरात श्री साई स्मारक समिती पाथरीच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक 9 एप्रिल 2022 ते सोमवार दिनांक 11 एप्रिल 2022 या काळात श्रीराम नवमी उत्सव साजरा होत असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी अॅड. श्री मुकुंद चौधरी यांनी दिली.
या महोत्सवा विषयी बोलताना चौधरी म्हणाले की, चैत्र शुद्ध नवमी श्रीप्रभूरामचंद्राचा जन्मदिवस श्री राम नवमी म्हणून साजरी केली जाते. श्रीसाईबाबा यांच्या हयातीतही श्रीरामनवमी कर्मभूमी शिर्डी येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जायची. त्याच प्रमाणे जन्मस्थान मंदिर पाथरी येथे गेल्या 22 वर्षांपासून हा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. यावर्षी कोरणा संदर्भातील नियम व अटींचे पालन करून श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून उत्सवातील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. पहाटे 5:15 वाजता श्री साईबाबांची काकड आरती, सकाळी 6:20 वाजता श्रींचे मंगल स्नान व दर्शन, सकाळी सात वाजता शिर्डी माझे पंढरपूर आरती व त्यानंतर श्रींची पाद्यपूजा, सकाळी आठ वाजता अभिषेक व विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राचे सामुदायिक पठण, दुपारी साडेबारा वाजता माध्यान्ह आरती व महाप्रसाद, सायंकाळी सहा वाजता श्रींची पाद्यपूजा, सायंकाळी साडेसहा वाजता धुपारती नंतर पालखी मिरवणूक व हरिपाठ, सायंकाळी साडेसात ते रात्री साडेआठ या वेळेत निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम होईल, रात्री नऊ वाजता शेजारती होईल व नंतर मंदिर बंद होईल.
तसेच मुख्यत्वेकरून शनिवार दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी
पहाटे 5:45 वाजता श्रींच्या फोटोची व श्री साईसच्चरित्र ग्रंथाची मंदिर ते द्वारकामाई मिरवणूक निघेल व मिरवणूक द्वारकामाईत पोहोचल्यानंतर अखंड श्री साईसच्चरित्र पारायणास प्रारंभ होईल, दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत सौ अनुराधा रवींद्र पिंगळीकर औरंगाबाद यांची कीर्तन सेवा, रविवार दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी पहाटे 5:45 वाजता श्री साईसच्चरित्र पारायणाची समाप्ती होईल व श्रींच्या फोटोची व श्रीसाईसच्चरित्र ग्रंथाची द्वारकामाई ते मंदिर अशी मिरवणूक निघेल, सकाळी नऊ वाजता धूनी पूजा, सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत सौ अनुराधा रवींद्र पिंगळीकर औरंगाबाद यांची श्रीराम जन्म विशेष कीर्तन सेवा होईल, दुपारी सव्वा बारा वाजता अॅड.श्री.मुकुंदराव चौधरी यांचे शुभहस्ते गव्हाच्या पोत्याचे पूजन होईल व त्यानंतर श्री सूर्यभान तुळशीराम सांगडे यांचे शुभहस्ते त्यांचे निशाणाचे पूजन व निशाण मंदिराचे शिखरावर उभारले जाईल, सायंकाळी पाच वाजता श्रींच्या रथाची भव्य मिरवणूक निघेल. तसेच सांगता दिवशी सोमवार दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत सौ अनुराधा रवींद्र पिंपळीकर औरंगाबाद यांची गोपाळकाल्याच्या कीर्तनाची सेवा होईल व त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होईल. ज्या साई भक्तांना अखंड पारायणात सहभागी व्हायची इच्छा आहे त्यांनी आपली नावे दिनांक आठ एप्रिल 2022 पूर्वी श्री सुधाकर नारायण बेदरे (मो.7559134128) यांच्याकडे समक्ष किंवा फोन वरून नोंदवावीत. अशी माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी अॅड. श्री मुकुंद चौधरी यांनी दिली.