“विद्यार्थ्यांनी सृजनशील व्हावे”: सौ. भावनाताई नखाते
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
सर्वच क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक शोधांमुळे प्रचंड कायापालट व प्रगती झाली आहे. आजचा शोध उद्या कालबाह्य होतो आणि त्या जागी नवीन शोध लावला जात आहे. जगामध्ये आपल्या देशाचे स्थान उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन कल्पनांना मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी सृजनशील व्हावे व नवनवीन शोध लावण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन सौ. भावनाताई नखाते यांनी केले.
दि. 26 फेब्रुवारी 2022 शनिवार रोजी शांताबाई नखाते विद्यालय पाथरी, तालुका पाथरी येथे, जि. प. परभणी (माध्य.) व शांताबाई नखाते विद्यालय पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन सौ. भावनाताई नखाते यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास सौ. कल्पनाताई थोरात (सभापती, पंचायत समिती पाथरी), मुकेश राठोड ( गटशिक्षणाधिकारी पाथरी), श्री चोरमारे पी. ए. (केंद्रप्रमुख, गुंज), श्री उडतेवार जी. जी. (केंद्रप्रमुख, बाभळगाव), प्राचार्य डहाळे के. एन., परीक्षक म्हणून प्रा. अशोक गायकवाड, प्रा. मोमीन मुस्ताक, प्रा. पूजा जाधव उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये पाथरी तालुक्यातील प्राथमिक गटातून 25 शाळा, माध्यमिक गटातून 8 शाळा, शिक्षक शैक्षणिक साहित्य गटातून 8 शिक्षक सहभागी झाले होते.
प्राथमिक गटातून योगेश तुकाराम वाघ (शांताबाई नखाते विद्यालय पाथरी) 3-D होलोग्राम या प्रयोगासाठी प्रथम क्रमांक, ऋषिकेश मधुकर कुटे (जि. प. प्राथ. शाळा, वडी) धुरशोषक यंत्र या प्रयोगास द्वितिय क्रमांक तर आदित्य बालाजी साखरे (शांताबाई नखाते प्राथ. शाळा पाथरी) वाटर अलार्म या प्रयोगासाठी तृतीय क्रमांक देऊन निवड करण्यात आली. उच्च माध्यमिक गटातून, शेख अर्शद शेख अहेमद (ने. सु. वि. पाथरी) शाश्वत कृषी पद्धती या प्रयोगासाठी प्रथम क्रमांक. भाग्यश्री विष्णू इंगळे (जि. प. आंतरराष्ट्रीय शाळा बोरगाव) रक्तगट तपासणी संच यासाठी द्वितीय क्रमांक, तुषार बालासाहेब गायकवाड (शा. न. वि. पाथरी) एअर बोट या प्रयोगासाठी तृतीय क्रमांक तसेच शिक्षक शैक्षणिक साहित्य, प्राथमिक गटातून बागल ए. एस. (शा. न. प्रा. शाळा पाथरी) तर माध्यमिक गटातून पाटील एस. आर. (जि. प. प्रशाला हदगाव) यांची अनुक्रमे गणितीय भिंगरी आणि त्रिकोणमिती या प्रयोगांची निवड करण्यात आली.
उदघाटकीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकेश राठोड (गटशिक्षणाधिकारी पाथरी) यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम शेळके यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्राचार्य किशन डहाळे यांनी केले.