चिमूरात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

ग्राहकच खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू __राम चिचपाले
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
संपूर्ण जग ग्राहक असून ग्राहक हाच या जगाच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो ग्राहकामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेला भरारी मिळते. शेवटी ग्राहकाच संपूर्ण अर्थव्यवस्थेचा मध्यवर्ती बिंदू मानला जातो. आज आपल्याला ग्राहक म्हणून जागृत होणे गरजेचे असून ग्राहकाला हक्क व कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका चिमुरचे अध्यक्ष तथा साप्ताहिक लोकप्रतिष्ठाचे संपादक राम चिचपाले यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तहसील कार्यालय चिमूर येथे आज पार पडलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिमूर तहसीलचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्रीधर राजमाने तर प्रमुख उपस्थितीत अन्नपुरवठा विभागाचे प्रमुख प्रवीण वानखेडे अखिल भारतीय ग्राहक पंचायत नेरी शहर चे अध्यक्ष रामचंद्र कामडी आदींची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शनात अन्नपुरवठा विभाग प्रमुख प्रवीण वानखेडे यांनी ग्राहकांना निवडीचा, मत मांडण्याचा, सुरक्षिततेचा हक्क असल्याचे प्रतिपादित केले तर अध्यक्ष स्थानावरून चिमूर तहसीलचे मान्य तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी उपस्थितांना अनेक दाखले देत ग्राहकाला जागृत होण्याची अत्यंत गरज असून जर तो जागृत झाला नाही तर त्याची पिळवणूक अटळ आहे असे सांगताना ग्राहक म्हणून आपण सर्वच सतर्क राहणे आवश्यक असून जाहिराती पासून सर्वांनी सावध राहावे तथा स्वदेशी निष्ठा जोपासावी व सामाजिक जाणीव याचे भान ठेवून व्यवहार करावे असे मार्गदर्शन उपस्थितांना केले. प्रसंगी निरीक्षक अध्यक्ष रामचंद्र कामडी यांनी आपले मौलिक विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राम चिचपाले यांनी उपस्थितांना विविध विषयाबाबतही मार्गदर्शन केले. यात वजन मापे, ऑनलाईन फसवणूक. खरेदी विक्रीत होणारी फसवणूक, विकलेला माल परत घेण्याचा कायदा, रुग्णावर दवाखान्यात होणारे आर्थिक अन्याय, हॉटेल व्यवसायावरील खाद्य पदार्थ विक्रेत्याकडे लायसन्स असणे कसे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश रामटेके यांनी तर संचालन व आभार जास्त धान्य दुकानदार सुरेखा शंबेकर यांनी केले .कार्यक्रमाला रास्त धान्य दुकानदार, चिमूर शहरातील व्यापारी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सदस्य व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला माल्यार्पणाने झाली.









