गोंडपीपरी येथील 23 वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू

ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
शहरातील जंगल परिसरात असणाऱ्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या गोंडपीपरी येथील 23 वर्षीय युवकाचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि.9 ऑक्टोबर रोज शनिवारला गोंडपीपरी येथे घडली आहे.
मृतक तरुणाचे नाव शुभम वामन सातपुते राहणार भगतसिंग चौक गोंडपीपरी असे असून पाण्याचा अंदाज चूकल्याने त्याचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदर घटना सकाळी 7 वाजता घडली. घटनेची माहिती गोंडपीपरी शहरासह तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी बघ्याची गर्दी उसळली. पोलिसांना घटनेची माहिती कळताच गोंडपीपरी पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि शोध मोहीम हाती घेतली.
मात्र तलावात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने मृतकाच्या मृतदेह शोधण्यासाठी बोट बोलविण्यात आली. त्या बोटीत बसून स्वतः गोंडपीपरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार जीवन राजगुरू तलावाच्या पाण्यात मृतकाचा शोध घेत होते.सकाळ पासून सुरू असलेली शोध मोहीम सांयकाळ पर्यंत सुरूच होती.तब्बल नऊ तासांनी त्याचा मृतदेह शोधण्यात पोलिसाना यश आले. मृतकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.पुढील तपास गोंडपीपरी पोलीस करीत आहेत..
शुभम कडे आर.एस.एस.चे गोंडपीपरी तालुका शारीरिक प्रमुख संघाची जबाबदारी होती.निखळ आणि प्रेमळ स्वभावाचा हा तरुण दोस्तीचा दुनियेत पारंगत होता.त्याच्या मृत्यू ने गोंडपीपरी सह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोंडपीपरी पासून जवळ असलेल्या जंगल परिसरातील तलावात खास करून हिवाळ्याच्या दिवसात तलावावर जलतरणाचा आनंद घेण्यासाठी बरेच तरुण तथा प्रौढ व्यक्ती जात असतात.अश्यात जलतरणाच्या नादात शुभम सातपुते या तरुणाचा दुर्दवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तरुण वयात दुर्दैवी अंत झाल्याने लाडक्या मुलाच्या मृत्यूने सातपुते परिवारावर दुःखाचे सावट पसरले असून गोंडपीपरीत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.