ताज्या घडामोडी

जिल्ह्यातील कर्णबधिरांना बेरा मशीनची प्रतीक्षा जिल्हा रुग्णालयात बेरा मशीनच नाही : खासदार धानोरकरांचे वेधले लक्ष

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

कर्णबधिरांची श्रवण चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेली बेरा मशीन चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपलब्धच नसल्याने येथे कर्णबधिरांना आणि त्यांच्या पालकांना श्रवण चाचणीसाठी नागपूर, सेवाग्राम, गडचिरोली जिल्ह्यात जावे लागत असल्याने वेळेसोबतच आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातच बेरा मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी विशेष शाळा कर्मशाळा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर औद्योगिक जिल्हा आहे. या ठिकाणी मजूर, शेतकरी, कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक मुलांमध्ये कर्णबधिर हा दोष आढळून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कर्णबधिरांच्या अनेक शाळा अस्तित्वात आहे. कर्णबधिरांच्या शाळेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतात. रोजमजुरी करून त्यांचे पालक कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कर्णबधिर मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी कर्णबधिरत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. दिव्यांगाच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. कर्णबधिर मुलांची श्रवणचाचणी करून प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी बेरा मशीन आवश्यक आहे. प्रत्येक जिल्हा रुग्णाल बेरा मशीन उपलब्ध असणे आवश्यक असताना चंद्रपूर जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही मशीनच उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली असून, कर्णबधिर मुले आणि त्यांच्या पालकांना चाचणीसाठी नागपूर, सेवाग्राम येथे पाठविले जाते. अनेकदा पालक प्रमाणपत्रासाठी नागपूरला जातात. मात्र, तेथेही काहीना काही अडचणी सांगून तारखा दिल्या जातात. नागपूर, सेवाग्राम येथे वारंवार जाणे खर्चिक बाब आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला भूर्दंड बसतो. सध्या कोविडचे संकट आहे. अशा परिस्थितीत बाहेर जिल्ह्यात जाणेसुद्धा धोक्याचे असते. मात्र, पर्याय नसल्याने अनेकांना जावे लागते. यामुळे कर्णबधिर मुले आणि त्यांच्या पालकांची गैरसोय होत असून, ही गैरसोय टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बेरा मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षक भारती विशेष शाळा कर्मशाळा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने खासदार बाळूभाऊ धानोरकर, व आमदार सौ.मा. प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. दरम्यान, त्यांनीही या मागणीची दखल घेत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी महेश भगत, उमेश घुलक्षे, गिरीश मसराम, रविकांत घोलप उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close