टावरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ट्रान्समिशन लि. कंपनीवर भारतीय क्रांतिकारी संघटनेची धडक
शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यास आंदोलन करू – डार्विन कोब्रा
तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
ब्रम्हपुरी व नागभीड तालुक्यातील टावरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातून रायपुर राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन लि. कंपनीने टावर लाईन कनेक्शन घेतले. शेतकऱ्यांना मुल्यांकन किंमतीत मोबदला देण्याचे ठरविले. ठरविल्याप्रमाणे आर्थिक मोबदला न देता २ – ३ वर्षांपासून टाळाटाळ केल्या जात आहे. अनेक निवेदने आंदोलन केलीत परंतु अजुनपर्यंत आर्थिक मोबदला देण्याची प्रक्रिया पुर्णत्वास आली नाही.
भारतीय क्रांतिकारी संघटनेने प्रकरणांची दख्खल घेऊन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा याचे नेतृत्वात रायपुर राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन लि. कंपनीच्या ब्रम्हपुरी कार्यालयावर धडक दिली. प्रलंबित प्रकरणे निकाली काढून शासन निर्णयानुसार आखलेल्या जमिनीच्या मुल्यांकन किंमतीनुसार शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला तात्काळ द्या अशी मागणी भारतीय क्रांतिकारी संघटनेतर्फे डार्विन कोब्रा यानी निवेदनाद्वारे बैठकीत केली. बैठकीदरम्यान ट्रान्समिशन लि कंपनीने येत्या २५ दिवसात प्रकरणे निकाली काढून शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याची ग्वाही लिखीत याप्रसंगी दिली.
२५ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला न दिल्यास भारतीय क्रांतिकारी संघटनेतर्फे उग्र आंदोलन करू असा इशारा भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा यानी दिला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा, भारतीय क्रांतिकारी संघटनेचे चिमुर विधानसभा अध्यक्ष कैलास भोयर, ग्राम पंचायत सदस्य अविनाश मेश्राम, प्रितेश रामटेके, देवाडेजी, शंकर कोरे व इतर ब्रम्हपुरी नागभीड तालुक्यातील टावरग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.