अतिक्रमण धारकांना नागरी सुविधा तात्काळ उपलब्ध करा
शेतकरी कामगार पक्षाची मागणी
प्रतिनिधी : चक्रधर मेश्राम
गडचिरोली नगर परिषद क्षेत्रातील अतिक्रमणधारक नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी, वीज, रस्ते व इतर नागरी सुविधा पावसाळ्यापुर्वी उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गडचिरोली नगर परिषद हद्दीतील अर्ध्याहून अधिक नागरी भाग हा बेकायदेशीर अतिक्रमण, बोगस लेआऊट आणि विनापरवानगी घराचे बांधकाम करुन वस्ती करीत असलेला आहे. यामुळेच हजारो नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड अभावी शासनाचा लाभ मिळू शकलेला नाही. अशाही परिस्थितीत विवेकानंदनगर, रामनगर, गोकुळनगर, सोनापूर कॉम्प्लेक्स, विसापूर भागात बऱ्यापैकी नागरी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. मात्र शहरातील संघर्षनगर, शिवनगर, कैकाडीवस्ती या भागातील नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून कोणत्याही नागरी सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. सदरच्या वस्त्यांमध्येही भारताचे नागरीक राहतात, त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी त्यांनाही तात्काळ प्रभावाने किमान सुविधा पुरविण्यात याव्यात. संघर्षनगर, शिवनगर, कैकाडी वस्ती व शहराच्या इतर भागातील अतिक्रमणधारक नागरिकांना पावसाळ्यापूर्वी किमान खडीकरणाचे तात्पूरते रस्ते व नाल्या तात्काळ तयार करुन द्यावेत. सदर वस्त्यांमध्ये भारत सरकार व WHO च्या दिशानिर्देशांच्या अधिन राहून पिण्याचे स्वच्छ पाणी पावसाळ्यात नियमीत पूरविण्यात यावे. सदर वस्त्यांमध्ये हिंस्त्र श्वापदे ( वाघ , बिबट , साप , विंचू इ. ) यापासून जीवीतास असलेला धोका लक्षात घेवून पथदिव्यांची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी. शहरातील सर्व अतिक्रमण धारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्यास नगर परिषदेच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा. भूमिगत गटार योजनेच्या नावाने शहरातील अंतर्गत रस्ते खराब करुन वाहतूकीस अडथळे व अपघातास निमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण केल्यामुळे नगर परिषदेच्या वतीने सदर कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून गुन्हे दाखल करण्यात यावेत. संघर्षनगर, शिवनगर, कैकाडी वस्तीमध्ये नगर परिषदने चालू सत्रात अंगणवाडी सुरु करावी. नगर परिषद क्षेत्रात रोजगार हमी योजनेअंतर्गत विकास कामे सुरु करण्यात येवून लॉकडावूनच्या स्थितीमध्ये बेरोजगारांना रोजगाराची सोय करण्यात यावी. किटकजन्य परिस्थिती निवारणार्थ अतिक्रमणधारक वस्त्यांमध्ये फवारणी व मच्छरदाणी वाटप उपक्रम नगर परिषदच्या वतीने राबविण्यात यावा. अतिक्रमणधारकांना शौच्छालय बांधकामाकरीता विनाअट अनुदान मंजूर करावे किंवा सार्वजनिक शौचालयांचे सदर वस्त्यांमध्ये बांधकाम करण्यात यावे. नगर परिषदने नविन व्यापारी संकूलाचे बांधकाम करुन सध्याचे फुटपाथ दुकानदार व अतिक्रमणधारक वस्त्यांमधील बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
येत्या दहा दिवसात नगर परिषदच्या वतीने तात्काळ प्रभावाने सोडवणूक होईल अशी अपेक्षा शेतकरी कामगार पक्षाने पत्रात व्यक्त केली असून महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, विजया मेश्राम, शिल्पा लटारे, पुष्पा कोतवालीवाले, संगिता बोदलकर, शुल्का बोबाटे, छाया भोयर,वेणू लाटकर यांच्या स्वाक्षऱ्या असलेले सदरचे पत्र पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी यांना सुध्दा पाठविण्यात आले आहे.