खऱ्या विद्यार्थ्यांना कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्यांच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते
ग्रामीण प्रतिनिधी : कल्यानी मुनघाटे मिंडाळा ता. नागभीड
सध्या विद्यार्थ्यांच्या शाळांना सुट्ट्या आहेत व कोरोना महामारी च्या भीषण प्रकोपामुळे विद्यार्थ्यांच्या बाहेर फिरायला जाण्याच्या आनंदावर विरजण पडलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी स्वतः च्या घरात राहून उन्हाळी सुट्टयांचा आनंद घेत आहेत. पण खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. अशीच नवं काहीतरी शिकण्याची, आत्मविश्वासाने बोलण्याची संधी, स्वतः आत्मसात केलेले ज्ञान इतरां समक्ष प्रस्तुत करण्याची संधी “शाळे बाहेरची शाळा” या उपक्रमा अंतर्गत नागपूर आकाशवाणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना देण्यात येते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, सामान्य ज्ञान व परिसर अभ्यासाशी निगडित असून नागपूर आकाशवाणीच्या माध्यमातून ग्रामीण, शहरी व अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येतो.
सदर कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डि. चापले, शिक्षणाधिकारी दिपेन्द्र लोखंडे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. “शाळे बाहेरची शाळा” हा कार्यक्रम आठवड्यातून दर मंगळवारी, गुरुवारी, शनिवारी सकाळी 10:30 वाजता नागपूर आकाशवाणीद्वारे 5.85 हर्ट्झ वर प्रसारित होतो. या कार्यक्रमा अंतर्गत प्रसारित झालेल्या 153 व्या भागामध्ये नागभीड तालुक्यातील जि. प. उ. प्राथमिक शाळा मेंढा किरमिटि शाळेतील इयत्ता ५ वी तील शर्वरी संजय खामदेवे या विद्यार्थिनीची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये शर्वरी ला 2 ने व 5 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या व कोरोना पासून स्व-सुरक्षा व दक्षतेविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. सदर मुलाखतीमध्ये तिने अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. तिच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुक तिची आई निलिमा वडील संजय खामदेवे, डायट विभागाच्या अधिव्याख्याता डॉ.ज्योती राजपूत, नागभीड क्षेत्राधिकारी डायट अधिव्याख्याता विनोद लवांडे, गटशिक्षणाधिकारी पी. नाट, शाळेचे मुख्याध्यापक सौ. ए. ढोंगे व सर्व सहकारी शिक्षक व शर्वरी चे वर्ग शिक्षक निंबोड सर यांनी केले.
शर्वरी च्या पालकांनी उपरोक्त सर्वांचे, शाळे बाहेरची शाळा या उपक्रमाचे जिल्हा समन्वयक श्री. विनोद ठाकरे, तालुक्यातील या विषयाच्या समावेशित शिक्षण तज्ञ कु. छाया विंचूरकर यांचे सहृदयतेने आभार व्यक्त केले.