ताज्या घडामोडी

हयात प्रमाणपत्र तातडीने सादर करा; सामाजिक न्याय योजनांतील लाभार्थ्यांना तहसील प्रशासनाचे आवाहन


जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

‘योजनेत लाभार्थ्याची नोंद आढळली नाही’ असा संदेश आल्यास घाबरू नका; तहसील कार्यालयाशी संपर्क साधा

पाथरी, दि. २४ जुलै : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या पाथरी तालुक्यातील लाभार्थ्यांनी डिजिटल हयात प्रमाणपत्र (डीएलसी) तातडीने काढून सादर करावे, असे आवाहन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, पाथरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पाथरी तालुक्यात डिजिटल हयात प्रमाणपत्र काढण्याची मोहीम सुरू आहे. संबंधित लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यास शासनाकडून मिळणारे नियमित आर्थिक लाभ, निवृत्तीवेतन किंवा इतर अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काही लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र काढताना ‘योजनेत लाभार्थ्याची नोंद आढळली नाही’ असा त्रुटी संदेश दिसून येत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. अशा लाभार्थ्यांनी कोणतीही चिंता न करता संबंधित योजना कार्यालय किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्या माहितीची पडताळणी करून आवश्यक ती तांत्रिक कार्यवाही केली जाईल, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार अशा लाभार्थ्यांची माहिती तातडीने पडताळून त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी समाजकल्याण विभाग, महा-ई-सेवा केंद्र, सीएससी केंद्र चालक तसेच संबंधित यंत्रणांनी अशा लाभार्थ्यांची माहिती तहसील कार्यालयाकडे उपलब्ध करून द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हयात प्रमाणपत्र सादर करण्याबाबत अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण असल्यास लाभार्थ्यांनी तहसील कार्यालय, पाथरी येथील संजय गांधी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close