ऊसतोड कामगारांच्या लेकरांसाठी शिक्षणाची नवी आशा!

लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतिदिनी पाथरीत शासकीय वसतिगृहाच्या मागणीसाठी ‘संकल्प’चा पुढाकार
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन; आगामी शैक्षणिक वर्षापासून वसतिगृह सुरू करण्याची मागणी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
कष्टकरी, वंचित आणि ऊसतोड कामगारांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून संकल्प मानव विकास संस्था, पाथरीच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. पाथरी तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे शिक्षण अखंडित राहावे आणि त्यांचे स्थलांतर रोखले जावे यासाठी पाथरी येथे ‘संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह’ तातडीने मंजूर करून सुरू करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे येथील व्यवस्थापकीय संचालकांना सादर करण्यात आले.
संकल्प संस्थेचे प्रमुख मा. सुधाकर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. पाथरी तालुक्यात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून दरवर्षी ऊसतोड हंगामात हजारो कुटुंबांना रोजगारासाठी राज्यातील व परराज्यातील विविध भागांत स्थलांतर करावे लागते. या स्थलांतराचा सर्वाधिक फटका त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला बसत असून अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहते.
मुलींच्या शिक्षणासमोर मोठे आव्हान
ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातील वयात आलेल्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुलींना गावी एकटे ठेवणे सुरक्षित नसल्याने पालक त्यांना सोबत घेऊन जातात. परिणामी अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागते आणि त्या कायमस्वरूपी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जातात. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून मुला व मुलींसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृह सुरू करण्याची गरज संस्थेने अधोरेखित केली आहे.
समाज कल्याण विभागाची सकारात्मक शिफारस
संकल्प मानव विकास संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, परभणी यांनीही या मागणीची गंभीर दखल घेतली आहे. पाथरी येथे मुला-मुलींसाठी प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे ‘संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह’ सुरू करण्याबाबतची शिफारस करून संबंधित प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी महामंडळाकडे पाठविण्यात आल्याची माहिती संस्थेने दिली.
हीच मुंडे साहेबांना खरी श्रद्धांजली
यावेळी बोलताना संकल्प संस्थेचे कार्यकारी संचालक मा. सुधाकर क्षीरसागर यांनी सांगितले की, “ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्या हातातील कोयत्याऐवजी लेखणी देणे आणि मुलींना सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे हीच लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारांना खरी कृतीशील श्रद्धांजली ठरेल.”
महामंडळाकडून या मागणीबाबत सकारात्मकता दर्शविण्यात आल्याचे सांगत आगामी शैक्षणिक वर्षापासूनच वसतिगृह सुरू करण्याबाबत तातडीने आदेश जारी करावेत, अशी आग्रही मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना संकल्प संस्थेचे समन्वयक विठ्ठल साळवे, बालासाहेब खोपे तसेच प्रकल्प समन्वयक सावन जोंधळे उपस्थित होते.
चौकट
पाथरीत शासकीय वसतिगृहाची गरज का?
ऊसतोड कामगारांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच खंडित होण्याची समस्या
मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न
शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या
शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी निवासी सुविधेची आवश्यकता









