परभणी जिल्ह्यात १०२ रुग्णवाहिका चालकांचा आंदोलनाचा इशारा

३० जुलै रोजी ढालेगाव बंधाऱ्यावर सामूहिक जलसमाधी घेणार!
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कार्यरत १०२ रुग्णवाहिका चालकांना केवळ ६ हजार रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असून, इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील वाहन चालकांना १८,६०० रुपये वेतन मिळत असल्याने त्यांच्यात तीव्र संताप पसरला आहे. सन २००६ पासून अवघ्या ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिमहा मानधनावर सेवा बजावणाऱ्या या चालकांना मागील ५ महिन्यांपासून कोणतेही मानधन मिळालेले नाही. समान स्वरूपाचे काम करूनही वेतनामध्ये असणारी ही मोठी तफावत अत्यंत अन्यायकारक असून, यामुळे चालकांच्या कुटुंबियांवर तीव्र आर्थिक संकट ओढवले आहे.

या गंभीर समस्येबाबत संबंधित प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या चालकांनी आक्रमक पाऊल उचलत आगामी ३० जुलै २०२६ रोजी पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा येथे सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात टी.एस. घांडगे, पी.ए. काकडे, व्ही.एम. ढोले, व्ही.डी. साखरे, डी.एस. कदम, आर.एन. देशमुख, जी.ए. ढवळे, एम.के. जाधव, पी.आर. यादव आणि बी.एस. मुंडे यांच्यासह सर्व चालक आक्रमक भूमिकेत सहभागी होणार आहेत.
आंदोलनापूर्वी सर्व चालकांच्या प्रलंबित मानधनाचा तात्काळ भरणा करावा आणि त्यांनाही इतर चालकांप्रमाणे समान व न्याय्य मानधन मंजूर करावे, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास किंवा कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासन व जिल्हा परिषद कार्यालयाची राहील, असा स्पष्ट इशारा चालकांनी दिला आहे. या गंभीर प्रकरणाची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही देण्यात आली असून प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.








