पाथरी येथे मुरूम माफियांचा सुळसुळाट

महसूल विभागाचे दुर्लक्ष
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील बलोणी बुद्रुक येथे सध्या मुरूम माफियांचा सुळसुळाट वाढला असून महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. गावातील काही शेतकरी तहसील प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता शेतातील मुरूम माफियांना विकत असल्याचे समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरूम माफिया हे शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर ट्रॉलीमागे सुमारे ५०० रुपयांप्रमाणे मुरूम खरेदी करत असून तोच मुरूम इतर गावांमध्ये दीड हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे. या अवैध व्यवसायामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचेदेखील मोठे नुकसान होत आहे.
तसेच गावातील रस्ते कामे व इतर बांधकामासाठी कोणतीही महसूल विभागाची अधिकृत परवानगी न घेता मुरूम वापरला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दिवसाढवळ्या ट्रॅक्टरद्वारे मुरूम वाहतूक होत असतानाही संबंधित प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अवैध मुरूम उत्खननामुळे शेतजमिनींचे नुकसान होत असून भविष्यात पावसाळ्यात मातीची धूप वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महसूल विभागाने तात्काळ लक्ष घालून अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









