ताज्या घडामोडी

पाथरी नगर परिषदेत बनावट अभिलेख प्रकरणाचा आरोप

नगराध्यक्षांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी नगर परिषदेमध्ये शासकीय अभिलेखांमध्ये फेरफार, खोटी नोंद, बनावट कागदपत्रांची निर्मिती तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करून शासकीय कामकाजात फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, नगराध्यक्षांसह पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्रानी यांनी २१ मे रोजी पाथरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीमध्ये नगराध्यक्ष आसेफ खान शेरगुल खान पठाण, कार्यालयीन अधीक्षक अशोक वाघुंबरे, कर निर्धारक तथा प्रशासकीय कर्मचारी सुरेश जोशी, कर्मचारी मिना दिगंबर आगळे व श्रीमती इंगळे यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
तक्रारीनुसार, पाथरी नगर परिषदेमध्ये स्थायी मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असताना अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांकडे प्रशासनाचा कार्यभार देण्यात आला होता. अशा परिस्थितीत १६ मार्च २०२६ रोजी अर्थसंकल्पीय विशेष सभा घेण्यात आली. मात्र, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील नियमांनुसार आवश्यक गणपूर्ती नसतानाही ही सभा बेकायदेशीरपणे घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सभेमध्ये कोणत्याही विषयावर चर्चा अथवा ठराव मंजूर न होता खोटी कार्यवाही नोंदविण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे, १६ मार्चच्या सभेचे हजेरीपत्रक वारंवार मागणी करूनही कोणत्याही सदस्याला उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित अभिलेख जाणूनबुजून दडवून त्यामध्ये फेरफार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, कार्यालयीन अधीक्षक अशोक वाघुंबरे यांनी प्रत्यक्ष सभेमध्ये चर्चा न झालेल्या “जुना आठवडी बाजार” या विषयाचा खोटा ठराव तयार करून तो मिनिट बुकमध्ये नोंदविला. हे कृत्य शासकीय अभिलेखात खोटी नोंद करून बनावट दस्तऐवज तयार करण्यास समकक्ष असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच १० एप्रिल व १३ एप्रिल २०२६ रोजी नगराध्यक्ष आसेफ खान पठाण यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने खोट्या नोटिसा तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्याच नोटिसांवर एकाच जावक क्रमांकाचा वापर करून तारखांमध्ये फेरफार करण्यात आला व तथाकथित “सुधारित नोटिसा” मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने जारी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, तत्कालीन मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी ११ मे २०२६ रोजी दिलेल्या लेखी पत्राद्वारे संबंधित नोटिसांवरील स्वाक्षऱ्या आपल्या नसल्याचे स्पष्ट केल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तसेच सुरेश जोशी यांनी संगनमत करून मुख्याधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आवक-जावक विभागातील कर्मचारी मिना आगळे व श्रीमती इंगळे यांनी एकाच जावक क्रमांकाचा वापर करून खोट्या नोटिसा तयार करत शासकीय नोंदींमध्ये फेरफार केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
नगराध्यक्षांनी काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खोटे व बनावट अभिलेख तयार केले असून मुख्याधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून सार्वजनिक पदाचा गैरवापर केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. न्यायालय, शासन व नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने हे सर्व कृत्य करण्यात आल्याने संबंधितांविरुद्ध बनावट दस्तऐवज तयार करणे, शासकीय अभिलेखांमध्ये फेरफार, फसवणूक, पदाचा गैरवापर व गुन्हेगारी कट यांसारख्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या गंभीर आरोपांमुळे पाथरी नगर परिषदेत मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close