साहेब चहा नको लस्सीच घेऊ! उन्हाचा फटका राजकीय नेत्यांना सुद्धा ?

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
सध्या परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात उन्हाचा कडाका इतका वाढला आहे की,रस्ते दुपारच्या वेळी ओस पडू लागले आहेत.पण राजकारण कसलं थांबतंय? निवडणुकांचे वारे आणि जनसंपर्क सुरूच आहे.
मात्र,या उन्हाचा फटका आता थेट नेत्यांच्या ‘चहापाना’ला बसल्याचे चित्र दिसत आहे.
नेहमीप्रमाणे एखाद्या कार्यकर्त्याची किंवा पदाधिकाऱ्याची भेट झाल्यावर नेते आपला ‘खास’ पाहुणचार दाखवण्यासाठी विचारतात,”काय,चहा घेणार का?”
मात्र,बाहेर ४० अंशांच्या वर गेलेले तापमान पाहता,कार्यकर्त्यांच्या कपाळावर घामाच्या धारा वाहत असतात. अशा वेळी नेहमी ‘हो’ म्हणणारे कार्यकर्ते आता मोठ्या हिमतीने म्हणतात,”साहेब,चहा नको… काहीतरी थंडच घेऊ! लस्सी किंवा ताक मिळेल का?”
आपल्या लाडक्या नेत्याला भेटायला आलेले हायटेक कार्यकर्ते आता नेत्यांसमोर चहाचा कप बघूनच घाबरू लागले आहेत.”साहेबांच्या शब्दाला मान देऊन चहा घेतला,तर आतून-बाहेरून ‘गरम’ व्हायची वेळ येईल,” अशी मिश्किल टिप्पणी एका कार्यकर्त्याने केली.त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नेत्यांनाही आपल्या ‘चहा पे चर्चा’ ऐवजी ‘लस्सी पे चर्चा’ करावी लागत आहे.
येलो अलर्टची दहशत
हवामान खात्याने मराठवाड्यासाठी येलो अलर्ट जाहीर केल्याने नेत्यांच्या दरबारात आता पिण्याच्या पाण्याचे माठ आणि लिंबू सरबतची रेलचेल वाढली आहे. ‘गरम चहा’ ही संकल्पना सध्या फक्त पहाटेपुरतीच मर्यादित राहिली असून, दुपारच्या सत्रात मात्र ताक,लस्सी आणि पन्हे यांनी राजकीय गाठीभेटींमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
थोडक्यात काय तर, परभणीच्या उन्हाने नेत्यांच्या चहाचा ‘घोट’ सध्या तरी कडू केला असून,लस्सीचा ‘गोडवा’ मात्र चांगलाच वाढला आहे!









