पाथरी तालुक्यात ग्रामीण भागात गुटखा विक्रेत्यांचा सुळसुळाट

पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गुटखा विक्रेत्यांचा सुळसुळाट वाढल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातलेली असतानाही अनेक ठिकाणी किराणा दुकानांवर खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील बाबळगाव, बाबळगाव फाटा, लोणी, गुंज, उमरा, गोंडगाव, अंधापुरी, कानसुर या गावांमध्ये काही विक्रेते मोटारसायकल व चारचाकी वाहनांद्वारे फिरून गुटखा पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली आहे. हे विक्रेते थेट दुकानदारांना गुटखा पोहोचवून विक्री करत असल्याने बंदीचे आदेश केवळ कागदावरच असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या संदर्भात पालकांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, “गुटख्याच्या सहज उपलब्धतेमुळे लहान मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. काही ठिकाणी कॅन्सरचे रुग्णही आढळत आहेत,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पाथरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही बेकायदेशीर विक्री सुरू असतानाही पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित ती कारवाई होताना दिसत नाही. यामुळे “पोलीस प्रशासन झोपले आहे का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, पोलीस विभागाने वेळोवेळी कारवाई केल्याचा दावा केला असला तरी ग्रामीण भागात अजूनही गुटखा विक्रीवर प्रभावी नियंत्रण आलेले नाही. त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनने विशेष मोहिम राबवून गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व पालकांकडून जोर धरत आहे.
गुटखा विक्रीवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संयुक्त कारवाई करणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त होत आहे.









