विद्यार्थ्यांनी कौशल्ये आत्मसात करुन ध्येय गाठावे : संगीता चव्हाण

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प्रत्येक व्यक्ती च्या आयुष्यात विद्यार्थी जीवन महत्वाचे असते, त्यामुळे या कालावधीत विविध कौशल्ये आत्मसात करून ध्येय गाठावे असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांनी केले.
बुधवार, दि. 31 रोजी तालुक्यातील सावळी येथे के. के. एम.महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार हे होते तर व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ.पंढरीनाथ धोंडगे, प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे,उपसरपंच गोपाळ काळे,पोलीस पाटील बाळासाहेब काळे, मुख्याध्यापक इक्कर,उपप्राचार्य डॉ. के. जी. हुगे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, विध्यार्थ्यानी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. योग्य वेळी प्रेरणा मिळाली तर आत्मविश्वास निर्माण होतो आणि शैक्षणिक यश प्राप्त होते.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला पोषक वातावरण महाविद्यालय स्तरावर उपलब्ध असते. विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यानी वाचन करणे अतिशय आवश्यक आहे.
डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे हे आहे. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे, क्रीडांगणे तयार करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, गलिच्छ वस्त्यांची सफाई, प्रथमोपचार, नागरी संरक्षण यामधून श्रमप्रतिष्ठा कळते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे यांनी केले तर अधक्षीय समारोप करताना विजयकुमार कत्रुवार यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.सुनीता कुकडे यांनी केले तर आभार डॉ.चेतनकुमार व्यास यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. सत्यानारायण राठी, नोडल ऑफिसर डॉ. पंडित मोरे, सुनील धुमाळ व संयोजन समितीने परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी,कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.









