शाळा महाविद्यालयांमधून पालकांची आर्थिक लूट बंद करा

अन्यथा आंदोलन-शिवसेना
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
शहर आणि तालुका परिसरातील काही शाळा व महाविद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींचे गणवेश , पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य त्याच शाळा व महाविद्यालयातर्फे चढ्या दारात विकले जात आहे. किंवा विशिष्ठ दुकानातूनच खरेदी करण्याची अट घातली जात आहे. हा प्रकार म्हणजे पालकांची आर्थिक लूट असल्याने अशा शैक्षणिक संस्थावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी शुक्रवार दि ८ जुलै रोजी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
वरोरा शहर आणि परिसरातील काही शैक्षणिक संस्थांनी शिक्षणाचे बाजारीकरण केले आहे.मोठी फी आकारणे,फी साठी विध्यार्थ्यांना त्रास देणे,विद्यार्थी व पालकांना अपमानास्पद वागणूक देणे हे प्रकार नित्याचेच झाले आहे. सोबतच शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके , गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य सुद्धा त्याच शाळेतून वाढीव दराने विकले जात आहे. किंवा विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची अट शाळा महाविद्यालया कडून घातली जात आहे. या माध्यमातून संबंधित शैक्षणिक संस्था नियमांचा भंग करून विध्यार्थी व पालकांची आर्थिक लूट करीत आहे. ज्ञानदानाचे एकमेव पवित्र कार्य करन्याचे काम असणाऱ्या अशा शैक्षणिक संस्थांनी या माध्यमातून जणू व्यवसायच सुरू केला असून त्याचा त्रास पालक आणि विद्यार्थ्यांना होत आहे.
यामुळे सदर सर्व शाळा महाविद्यालय व कनिष्ट महाविद्यालय यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी ज्ञानेश्वर चहारे प्रभारी गटशिक्षण अधिकारी, नामदेव राऊत शिक्षण विस्तार अधिकारी, सीमा राऊत शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती वरोरा यांचेकडे निवेदनातून केली आहे.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जीवतोडे, नगरसेवक दिनेश यादव,संदीप मेश्राम,जगदीश पंधरे,आलेख रट्टे,भूषन बुरीले, मनीष दोहतरे, हमुमान ठेंगने, वामन टोंगे उपस्थित होते.
परिणामकारक कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मुकेश जीवतोडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.