ताज्या घडामोडी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता रॅलीचे आयोजन

तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहावे -श्रीमती गीता गुठ्ठे

जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराचे स्मरण करून त्यांचे विचार नवीन पिढीने अंमलात आणावेत. दरवर्षी त्यांचा जन्मदिवस हा ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे तरुण पिढीने त्यांच्या विाचारांचा स्वीकार करून व्यसनापासून दूर राहावे व शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले.


राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त आज सामाजिक न्याय विभागाकडून राजगोपालचारी उद्यानात समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या समता दिंडीच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती गुठ्ठे होत्या. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला व्याख्याते किर्तीकुमार बुरांडे आणि समाजकल्याण अधिकारी अमित घवले उपस्थित होते.


भारतीय राज्यघटनेचे कलम-४६ राज्य हे जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करील या तरतुदी आहेत. त्यानुसार समाजकल्याण विभाग कार्य करीत असल्याचे श्रीमती गुठ्ठे यांनी यावेळी सांगितले.
राजर्षी शाहू महाराजांचे जीवनचरित्र व त्यांचे कार्य या विषयी माहिती सांगताना महाराजांनी निर्माण केलेल्या गोष्टींचा आपण उपभोग घेत असून राजर्षी शाहू महाराज हे लोककल्याणकारी राजे होते. त्यांचा कारभार हा लोकाभिमुख होता व आजच्या लोकशाहीची बीजे त्यांनी त्या काळात रुजवली होती. आजच्या लोकशाहीवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव आपणास दिसून येतो, असे किर्तीकुमार बुरांडे यांनी सांगितले.
महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षणास महत्व दिले व शिक्षण हे सक्तीचे व मोफत केले. त्यांच्या काळात जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना एक रुपया दंड आकारण्याची तरतूद करुन लहान मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घेतली होती. शिक्षणाबरोबरच महाराजांनी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु करुन त्यांची निवास व भोजनाची सोय केली. तसेच शाहू महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा तसेच अस्पृश्यता निवारणासाठी व विधवांच्या पुनर्विवाहासाठी मोलाचे कार्य केले. राजर्षी शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी अमित घवले यांनी केले. या दिंडीमध्ये चित्ररथासह नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, पृथ्वीराज देशमुख मुलींची सैनिकी शाळा, अनुसूचित जाती आश्रमशाळा कारेगाव रोड आणि माध्यामिक आश्रमशाळा दर्गारोड, परभणी येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. राजर्षी शाहू महाराजांचा देखावा सादर केलेल्या आश्रमशाळा दर्गारोड येथील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील मुलांची व मुलींची शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतीगृहे, विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा, अनुसूचित जाती आश्रमशाळा, अस्थिव्यंग विद्यालय येथील इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थी व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शासनामार्फत १२ ते २६ जूनदरम्यान नशामुक्त पंधरवड्याचे औचित्य साधून शाहीर काशीनाथ उबाळे यांच्या पथकाने ‘व्यसनमुक्ती व लेक वाचवा’ या विषयावर गीत सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवणअप्पा साळेगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती एल. एस. गायके यांनी केले. कार्यक्रमास शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, सामाजिक न्याय विभागातील शासकीय वसतिगृह व निवासी शाळांचे गृहपाल, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, कर्मचारी व बीव्हीजी, क्रीस्टलमधील बाह्यस्रोत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close