गरिबांची फ्रिज ग्राहकाअभावी जागेवरच

तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
गरीबाची फ्रिज मानल्या जाणाऱ्या मातीच्या माठाची मागणी ग्राहकच नसल्याने ठप्प झाली आहे. माठातील थंड पाणी पिण्याची अनेकांना आस आहे व त्यासाठी नवा माठ आणायचाही आहे पण संचारबंदी मुळे कोणी घराच्या बाहेर पडत नाहीत परिणामी गरिबांचे फ्रिज ग्राहका अभावी जागेवरच आहेत. व यामुळे हजारो रुपये खर्च करून कष्टाने तयार केलेले माठ याची विक्री होत नसल्याने कुंभार समाज बांधव संकटात सापडले आहेत. उन्हाळ्याच्या काळात थंड पाणी सर्वांनाच हवे असते श्रीमंत कुटुंबातून फ्रिजमधील बाटल्यातील थंडगार पाणी पसंत केली जाते पण गरीब कुटुंबांना मातीच्या माठातील थंड पाणी परवडणारे असते अर्थात फ्रिज व माठातील पाण्याची चवही वेगळी असल्याने अनेक श्रीमंत व मध्यमवर्गीय कुटुंबातून फ्रिज असलातरी माठ आवर्जून आणला जातो व त्यातील पाणी पिण्याला प्राधान्य दिले जाते. आताही उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने अनेकांना नव्या माठाची गरज आहे पण कोरोनामुळे सुरू असलेला लॉकडाऊन व संचारबंदी अडचणीची झाली आहे. ग्राहकांना इच्छा असूनही माठ विकत घेण्यासाठी जाता येत नाही व तयार असलेल्या माठ विकले जात नसल्याने कुंभार समाज बांधव हवालदिल झाले आहेत. मातीचे माठ रांजण घागरी व अन्य साहित्य वर्षभरात तयार केल्यावर त्यांची सर्वाधिक विक्री उन्हाळ्याच्या चार महिन्याच्या काळात होते पण आता याच काळात लॉकडाउन आणि संचारबंदी लागू झाल्याने माठ व्यवसाय ठप्प झाला आहे. माठ तयार करणे, रांजण तयार करणे तसेच पणत्या घागरी तयार करून त्यांच्या विक्रीवर उपजीविका अवलंबून असल्याने कुंभार समाज बांधवावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. तयार केलेल्या मालात मजूरी देखील मिळण्याची शाश्वती नसल्याने अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वस्तूच्या विक्रीवर वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. परंतु आता विक्री न झाल्याने वर्ष कसे काढायचे असा प्रश्न समाज बांधवांना पडला आहे.