ताज्या घडामोडी

शिकलेल्या महिलांनी ढोंगी महाराजांच्या प्रवचनाला जावू नये-सिमाताई बोके

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

मराठा सेवा संघ जिल्हा चंद्रपूर च्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी “छत्रपती शिवरायांचे महिलांविषयक धोरण आणि सध्याचे वास्तव” या विषयावर प्रसिध्द व्याख्यात्या जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षा सिमाताई बोके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

त्या  मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की मोगल, आदिलशाही, निजामशाही राजवटीत महिलांना शेकडो वर्षे अनेक त्रासाला व शोषणाला सामोरे जावे लागत होते.स्वराज्य निर्माण करुन महिलावर होत असेलेला अन्याय छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्णपणे दूर करून स्वराज्यामध्ये महिलांना संपूर्ण संरक्षण दिले. एवढेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील महिलांना आर्थिक संपन्न करण्यासाठी लढाईचे साहित्य बनवण्याचे प्रशिक्षण सुद्धा दिले.त्यातून त्यांना रोजगार मिळवून दिला आणि महिलांना आर्थिक संपन्न केले.

स्वराज्यातील अनेक प्रसंगात शिवाजी महाराजांनी आई जिजाऊ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतले. तसेच संख्येने ५० टक्के असलेल्या महिलांना स्वराज्याच्या प्रगतीमध्ये सहभागी करून स्वराज्य भक्कम करता येते हे सिद्ध केले.यावरुन शिवाजी महाराजांनी स्वराज्यात महिलांना नेतृत्व करण्याची संधी दिली व सहभागी करून घेत महिला आरक्षण त्याकाळात सुरू केले. शिवाजी महाराज लोकशाहीला प्रेरणा देणारे राजे होते असे बोके यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

एकटी महिला अन्यायाला बळी पडतात त्यासाठी आज महिलांनी संघटित होऊन सामुहिक अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे.न्याय, सन्मान मिळविण्यासाठी तसेच कलागुणांना वाव मिळविण्यासाठी महिलांनी जिजाऊ ब्रिगेडमध्ये सामिल झाले पाहिजे.सामाजिक, राजकीय चळवळीत सहभागी झाले पाहिजे असे आवाहन सिमाताई बोके यांनी केले.
सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे महिला शिकून उच्च पदावर गेल्या आहे. पण बऱ्याच शिकलेल्या महिला सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना विसरल्या असून बुवा-बापू ढोंगी महाराजांच्या प्रवचनाला लाखोच्या संख्येने जातात आजच्या महिलांनी तार्किक वैज्ञानिक विचार करून अवैज्ञानिक, अंधश्रद्ध पसरवणाऱ्या फालतू प्रवचनाला जावू नये.आपले अनुकरण मुले करतात तेही पुढे चमत्कारावर विश्वास ठेवतात आणि मेहनत करने सोडून देतात त्यामुळे त्यांचे आयुष्य उध्वस्त होते. पुढची पिढी सक्षम व भारताची प्रगती करायची असेल तर महिलांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे अन्यथा वाईट दिवस लवकरच येतील असे त्या म्हणाल्या.

चंद्रपूर गौरव पुरस्कार इको प्रो संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.सन्मानामुळे माझी जबाबदारी वाढली आहे असे बंडूभाऊ धोत्रे यांनी मनोगतात सांगितले.
शिवजयंती महोत्सव आणि जाहीर व्याख्यान समारंभाचे अध्यक्ष मराठा उद्योजक कक्ष चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष संतोष कुचनकर यांनी मार्मिक मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाच्या उदघाटिका रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबुपेठ चंद्रपूरच्या अध्यक्षा चंदा वैरागडे यांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अर्चना चौधरी यांनी करून मराठा सेवा संघाच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.

प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक जेऊरकर, मराठा सेवा संघ चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष इंजि. दीपक खामनकर, संभाजी ब्रिगेड चंद्रपूर महानगराचे अध्यक्ष विनोद थेरे, संभाजी ब्रिगेड चंद्रपूर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा लता होरे, चंद्रपूर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ.डॉ. प्रितीताई बांबोडे, जनता डि.एड. कॉलेज चंद्रपूरच्या प्राचार्या शुभांगी आसुटकर, चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या  वैशाली भेदे यांची उपस्थिती होती.सुत्रसंचालन जिजाऊ ब्रिगेडच्या संघटक शुभांगी ठाकरे यांनी केले तर आभार जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्या सीमाताई तेलकापल्लीवार यांनी मानले.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close