ताज्या घडामोडी

महाशिवरात्रीनिमित्त विश्वेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी

उत्सवास ९६ वर्षांची परंपरा.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

तालुक्यातील इसाद येथील प्रसिद्ध अशा विश्वेश्वराच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. हर हर महादेव… जय भोलानाथ… विश्वेश्वर महाराज की जय… या घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. मंदिर परिसरामध्ये केलेली विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
यावेळी उपस्थित हजारो भाविक-भक्तांनी विश्वमित्रांच्या मूर्तीस बेलपान व दूध पाण्याचा अभिषेक घातला. या महाशिवरात्र सप्ताहास तब्बल ९६ वर्षांची परंपरा आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी सप्ताहाचे आयोजन केले जाते यामध्ये किर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, हरिपाठ, अन्नदान असे विविध उपक्रम राबविले जातात. यंदा सिताराम महाराज रोडगे, नामदेव महाराज, प्रभू महाराज मरगळवाडीकर, अशोक महाराज हुंबे, मुकुंद महाराज देऊळगावकर, विजयानंद महाराज सुपेकर, भगवान महाराज इसादकर,भारत महाराज जोगी, शिवाजी महाराज बोकारे, माऊली महाराज मुंडेकर, निवृत्तीनाथ महाराज इसदकर, ज्ञानेश्वरी प्रवचनकार विजयानंद महाराज ईसादकर, भागवताचार्य आश्रुबा महाराज नरवाडीकर, अच्युत महाराज दस्तपूरकर यांची किर्तने झाली. तसेच मोठा मारुती भजनी मंडळ, गोसावी मारोती भजनी मंडळ, पोखरणी देवी भजनी मंडळ, अरबूजवाडी भजनी मंडळ, खंडाळी भजनी मंडळ, हरी महाराज भजनी मंडळ, महादेव भजनी मंडळ गुंजेगाव, भजनी मंडळ पांढरगाव भजनी मंडळ, भैनाजवाडी भजनी मंडळ, इसाद भजनी मंडळ यांनी हरिजागर सेवेत हजेरी लावली. एकता आणि अखंडतेची शिकवण देणाऱ्या या आध्यात्मिक सोहळ्यास गावासह पंचक्रोशीतील लेकीबाळी, पाहुणे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात हरिनामाचा जयघोष करत पालखीचे मार्गाक्रमण संपूर्ण गावात पार पडले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

अन् आनंद द्विगुणित झाला…

महाशिवरात्र उत्सव ही ईसादची ओळख आहे. सप्ताहात गावातील घराघरात भक्तिमय वातावरण असते. गावातील लेकींसाठी हा उत्सव आनंदाची पर्वणी असतो. गेल्या ९६ वर्षाची परंपरा असलेला हा उत्सव गेल्या दोन वर्षात झाला नव्हता. परंतु यंदा कोरोनाचे निर्बंध कमी झाल्याने हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आहे.

रखमाजी भोसले
अध्यक्ष, विश्वनाथ मंदिर संस्थान

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close