तात्काळ पंचनामे करुन सरसकट नुकसान भरपाई द्या आ. किशोर जोरगेवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील ग्रामीण भागातील पूरपस्थितीची पाहणी केली असून येथील उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. पूराच्या पाण्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
यावेळी तहसीलदार विजय पवार, कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, मंडळ अधिकारी किशोर नवले, घुग्गुसचे पोलिस निरिक्षक आसिफ शेख, यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, मुन्ना जोगी, वढा गावचे सरपंच सुनिल निखाडे, किशोर वरारकर, सचिन तोडे, नंदकिशोर वासाडे, चंदु माथने, पिपरिच्या सरपंच्या वैशाली माथने, माजी सरपंच गणपत कुडे आदींची उपस्थिती होती.
यवतमाळ जिल्हातील नदी पात्रात वाढ झाल्यामुळे चंद्रपूरातील नद्यांना पूर आला आहे. सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरी या पूराच्या पाण्याने शहरी भागासह ग्रामीण भागाचे मोठे नुकसान केले आहे. चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार जोरगेवार यांनी शहरी भागाच्या पाहणी नंतर आज मतदार संघातील ग्रामीण भागाची पाहणी केली असून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे.
यावेळी त्यांनी धानोरा, पिपरा, मारडा यासह प्रभावीत गावांची पाहणी केली आहे. पूराचे पाणी शेतात साचल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकतीच लावलेली शेतपिके पाण्याखाली गेल्याने पिक पूर्णता नष्ट झाली आहेत. शेतीसह या भागातील घरांचेही मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील पंचनामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सुचना यावेळी आमदार जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे. यावेळी जोरगेवार यांनी शेतक-यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी समजून घेत सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.