चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते उष्णतामान , सुरु असलेल्या शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करा -यंग चांदा ब्रिगेडची मागणी
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चंद्रपूरातील वाढत्या उन्हाचा पारा लक्षात घेता शाळांना उन्हाळी सुट्टया जाहीर करा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांना केली असून सदरहु मागणीचे एक निवेदन त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगांवकर, अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहराध्यक्ष कौसर खान, दुर्गा वैरागडे, चंद्रशेखर देशमुख, राम जंगम यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाळा हा उष्णतेसाठी जगात प्रसिध्द आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहे. त्यातच जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर व जिल्ह्यातील इतर शहरात होतांना निदर्शनास येत आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने नागपूर जिल्ह्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली. असे असतांना जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना मात्र अद्यापही उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. सकाळची शाळा असली तरी सुध्दा मुले घरी येत पर्यंत दुपारचा1 वाजताे . आणि त्याच वेळेत उन्हाचा तडाखा सर्वाधिक असल्याने १५ वर्षाखालील मुलांना त्याचा अधिक त्रास होत आहे. सद्यस्थितीत उष्माघाताचे प्रमाण वाढून त्यात अनेकांचे बळी गेले आहे. अशातच उष्माघाताचे नाहक बळी लहान मुले ठरणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे याचा गांभिर्याने विचार करुन चंद्रपूरातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहिर करण्यात यावी अशी मागणी सदरहु निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांना करण्यात आली आहे.