ताज्या घडामोडी

वनअकादमी चंद्रपूर येथे कौशल्‍य विकास विद्यापीठ स्‍थापन करावे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी.

विनियोजन विधेयकावरील चर्चेदरम्‍यान विविध विषयांकडे वेधले लक्ष.

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

चंद्रपूर वन प्रशासन, विकास, संशोधन व व्‍यवस्‍थापन प्रबोधिनी अर्थात वन अकादमी चंद्रपूर येथे कौशल्‍य विकास विद्यापीठ स्‍थापन करावे अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली.
दिनांक २३ मार्च २०२२ रोजी विधानसभेत विनियोजन विधेयकावरील चर्चेदरम्‍यान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी काही महत्‍वपूर्ण विषयांकडे शासनाचे लक्ष वेधले व त्‍याअनुषंगाने मागण्‍या नोंदविल्‍या. या विधेयकावरील चर्चेत बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, वनअकादमी चंद्रपूर येथे कौशल्‍य विद्यापीठ स्‍थापन करावे यासाठी आपण सातत्‍याने पाठपुरावा करीत आहोत. सन २०२१ च्‍या हिवाळी अधिवेशनात कौशल्‍य विकासमंत्र्यांनी याबाबतचा प्रस्‍ताव तपासुन सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन विधानसभागृहाला दिले होते, मात्र अद्याप या आश्‍वासनाची पुर्तता झालेली नाही. कौशल्‍य विकास विद्यापीठ स्‍थापन करण्‍याच्‍या दृष्‍टीने वनअकादमी चंद्रपूर येथे अनुकुलता व उपलब्‍धता आहे. त्‍यामुळे याठिकाणी कौशल्‍य विकास विद्यापीठ स्‍थापन करण्‍यात यावे अशी मागणी त्‍यांनी यावेळी केली.
चंद्रपूर आणि लातुर येथे स्‍मार्ट आयटीआय निर्मीतीचा प्रस्‍ताव शासन स्‍तरावर प्रलंबित आहे. सन २०१८ मध्‍ये याबाबत शासनाने तत्‍वतः मान्‍यता दिली आहे. या प्रस्‍तावाबाबत त्‍वरीत सकारात्‍मक निर्णय घ्‍यावा अशी मागणी त्‍यांनी यावेळी केली. बल्‍लारपूर नागरी प्रकल्‍पाअंतर्गत अतिरिक्‍त अंगणवाडी केंद्र मंजूर करण्‍याचा प्रस्‍ताव शासनाकडे सादर करण्‍यात आला आहे. या प्रस्‍तावाला मंजूरी मिळण्‍याबाबत महिला व बालविकास मंत्रयांना आपण ८४ पत्रे पाठविली आहेत असे सांगत त्‍वरीत हा प्रस्‍ताव मंजूर करण्‍याबाबतची मागणी त्‍यांनी यावेळी केली. शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर येथे उपकरणीकरण विभागात पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम सुरू करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव शासनाला सादर करण्‍यात आला आहे. या प्रस्‍तावाला अद्याप मान्‍यता मिळालेली नाही. सदर प्रस्‍तावाला त्‍वरीत मान्‍यता देण्‍याची मागणी त्‍यांनी यावेळी केली. शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर येथे ६५ शिक्षकेतर पदांच्‍या निर्मीतीचा प्रस्‍ताव शासनदरबारी प्रलंबित आहे या प्रस्‍तावाला त्‍वरीत मान्‍यता देण्‍याची मागणी त्‍यांनी यावेळी केली.
यासह पोंभुर्णा तालुक्‍यातील धडक सिंचन विहीरींसाठी निधी उपलब्‍ध व्‍हावा, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मंजूर हडस्‍ती उपसा सिंचन योजनेच्‍या विशेष दुरूस्‍तीचे काम करावे, मौलझरी लघु प्रकल्‍पाच्‍या विशेष दुरूस्‍तीचे काम हाती घेण्‍यात यावे, शिवणी उपसा सिंचन योजनेच्‍या बंदनलिका वितरण प्रणालीचे काम त्‍वरीत करावे, राजोली माजी मालगुजारी तलावाची विशेष दुरूस्‍ती करावी, जानाळा लघु प्रकल्‍पाच्‍या विशेष दुरूस्‍तीचे काम हाती घ्‍यावे, भसबोरण लघु प्रकल्‍पाच्‍या कालव्‍याच्‍या विशेष दुरूस्‍तीचे काम हाती घ्‍यावे, पिपरी दिक्षीत लघु प्रकल्‍पाच्‍या विशेष दुरूस्‍तीचे काम, काळाडोह पुरक कालव्‍याच्‍या विशेष दुरूस्‍तीचे काम त्‍वरीत हाती घ्‍यावे या मागण्‍या त्‍यांनी केल्‍या.
पोंभुर्णा तालुक्‍यातील देवाडा खुर्द येथील पाणी पुरवठा योजनेशी संबंधित तांत्रीक अडचणी दूर करून पाणी टंचाईची समस्‍या दूर करावी अशी मागणी त्‍यांनी यावेळी केली. राजुरा तालुक्‍यातील विहीरगांव व मुर्ती येथे प्रस्‍तावित ग्रीनफिल्‍ड विमानतळाच्‍या उभारणीसंदर्भात वनजमिनीच्‍या हस्‍तांतरणाचा फेरप्रस्‍ताव केंद्र सरकारकडे पाठविण्‍यात यावा अशी मागणी त्‍यांनी या चर्चेदरम्‍यान केली. यासंदर्भात आपण प्रधान सचिव (वने) यांना ५६ पत्रे पाठविली आहेत मात्र कार्यवाहीचा अभाव आहे. सदर विमानतळाची उभारणी झाल्‍यास या जिल्‍हयाच्‍या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्‍याचे ते यावेळी बोलताना म्‍हणाले. माजी मुख्‍यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्‍नमवार यांची जयंती शासकीय तसेच निमशासकीय स्‍तरावर साजरी करण्‍यात यावी असेही ते यावेळी म्‍हणाले. व्‍यवसाय शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन कुशल कामगार निर्मीतीने अधिक रोजगार व स्‍वयंरोजगार वाढविणे या शासनाच्‍या महत्‍वाकांक्षी योजनेनुसार ३३४ कंत्राटी शिक्षकांची औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थांमध्‍ये कंत्राटी निदेशक म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. हे निदेशक ११ वर्षापासून अत्‍यंत मानधनावर कार्यरत आहे. या कंत्राटी निदेशकांना नियमित शिक्षकांच्‍या पदभरतीमध्‍ये समायोजीत करण्‍याची मागणी त्‍यांनी यावेळी केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close