लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा – आ.डॉ.रत्नाकर गुट्टे
९ रूग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
कोरोनाच्या संकटाने आपल्या आरोग्य व्यवस्थेतील उणीवा दाखवून दिल्या आहेत. चांगलं आरोग्य राहिलं तर माणसाचं आयुष्य सुध्दा वाढतं. मात्र रूग्णांकडे कानाडोळा केल्यामुळे सरकारी ऐवजी खाजगी रूग्णालयाकडे लोकांचा कल वाढतो आहे. त्यामुळे आरोग्य सेवा हिचं ईश्वर सेवा हे ब्रीद लक्षात घेऊन रूग्णांची काळजी घ्या. त्यांना दिलासा द्या. त्यांच्याशी आपुलकीने व प्रेमाने वागा. तेव्हाचं सरकारी रूग्णालयाविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल. म्हणून लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, असे आवाहन गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित आरोग्य अधिकारी आणि कर्मचा-यांना केले.
मतदार संघातील लोकांच्या वैद्यकीय सेवेसाठी गंगाखेड, पालम आणि पूर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणा-या विविध उपकेंद्रांना आमदार निधीतून देण्यात येणा-या रूग्णवाहिकांच्या लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. त्यामध्ये गंगाखेड ३, पालम २ आणि पूर्णा ४ अशा एकूण ९ रूग्णवाहिकांचा समावेश आहे.
कोरोनाचे भयावह संकट आपण अनुभवले आहे. वैद्यकीय सुविधांची कमतरता असल्याने अनेकांनी लाखमोलाची माणसं गमावली आहेत. त्यामुळे या धावपळीच्या युगात माणसाचं आरोग्य उत्तम आणि चांगलं राहिलं तरचं त्याचं भविष्य सुखकर ठरणार आहे. त्यामुळे आरोग्याच्या चांगल्या सोई – सुविधा उपलब्ध करून देणं हे लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे. तसचं चांगल्या सेवा देणं हे डॉक्टर- नर्स म्हणून तुमचंही कर्तव्य आहे. जनता आणि प्रशासन यांची गट्टी जमली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. म्हणून या रूग्णवाहिकांचा अडल्या – नडल्या लोकांना उपयोग होईल, याची दक्षता आपण सर्वानीचं घेतली पाहिजे. तसेच या रूग्णवाहिका आपल्या घरच्या असल्या सारख्या जपा. त्यांची योग्य काळजी घ्या. वेळेवर दुरूस्ती करा. सर्वसामान्यांच्या हिताकडे विशेष लक्ष द्या.आरोग्य व्यवस्थेत खूप चांगली माणसं आहेत. परंतु काही कामचुकार लोकांमुळे संपूर्ण व्यवस्था बदनाम होते. त्यामुळे आपल्या जबाबदा-या ओळखून वागा. सौजन्याने बोला. संयमाने ऐका. प्रेमाने सांगा. आपुलकीने विचारा. असाही कानमंत्र आ.डॉ.गुट्टे यांनी पुढे बोलताना आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना दिला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, जिल्हा परिषद सदस्य गणेश दादा रोकडे, जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, जिल्हा परिषद सदस्य राजेश फड, सभापती मंजाराम मुंडे, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, अॅड.मिलिंद क्षिरसागर, बाबा पोले, हनुमंत लटपटे, नगरसेवक बाळासाहेब रोकडे, पालम-पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, गणेशराव घोरपडे, नगरसेवक अजीम शेठ, नगरसेवक उबेद खान पठाण, विजयराव घोरपडे, नगरसेवक मोबीन कुरेशी, बाबासाहेब एंगडे, राहुल शिंदे, गंगाखेड आरोग्य अधिक्षक डॉ.हेमंत मुंडे, डॉ.उमाकांत बिराजदार, पालम तालुका आरोग्य अधिकारी, पूर्णा गटविकास अधिकारी सुनिता वानखेडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हरिभाऊ गाडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशजी गिनगिने, डॉ.गजानन राऊत, डॉ.माजित खान, डॉक्टर कल्पना आळणे, डॉ.अविनाश बेलोकर यांच्यासह गंगाखेड, पालम आणि पूर्णाचे सर्व आरोग्य कर्मचारी व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीनही तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र संपन्न झालेल्या या लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिराजी कांबळे तर आभार गणेश कदम यांनी व्यक्त केले.
…तर पुढच्या टर्मलाही मीच आमदार
जवळपास ३०० गावे आणि ४०३ बुथांचा हा मोठा मतदार संघ आहे. तरीही वर्षानुवर्ष प्रलंबित असणारे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. राज्य तसेच केंद्रातील मंत्री व संबंधित विभागांना भेटून विकासकामे मार्गी लावतो आहे. त्याचीच पावती म्हणजे मतदार संघात होणारे कोट्यावधी रूपायांचे रस्ते होय. अनेक गावांना सभा मंडप, रस्ते, बंधारे, सभागृह, शादीखाना अशा स्वरूपाची विकासकामे मी आमदार निधीतून देतो आहे. विविध कामे प्रस्तावित आहेत. त्याच विकास कामांच्या जोरावर मी हक्काने आपल्याकडे पुढची टर्म सुध्दा मागणार आहे. आणि त्याचं कामांमुळे तुम्ही पुढच्या टर्मलाही मलाचं मतदान कराल,असा विश्वास मला आहे. त्यामुळे काळजी करू नका पुढच्या टर्मलाही मीच आमदार आहे, असे आ.डॉ.गुट्टे यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली.
म्हणून बायको-लेकरं घेऊन गावं फिरू नका…
वैद्यकीय सुविधा गतिमान व्हावी तसेच गरजूंना योग्य व वेळेवर उपचार व्हावा, या उदात्त भावनेतून आमदार साहेबांनी आपल्याला या ९ रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचं भान ठेऊन योग्य कामालाचं रूग्णवाहिका वापरा. नाही तर आपल्याला कोण विचारणार? असं समजून ‘त्या’ रूग्णवाहिकेत आपली बायको-लेकरं घेउन गावं फिरू नका. म्हणजे झालं, असा सल्ला जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले यांनी रूग्णवाहिका चालकांना देताच उपस्थितांमध्ये हस्यकल्लोळ उडाला.