ताज्या घडामोडी

सोयी-सवलती पासून कोणीही वंचित राहू नये

आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

एटापल्लीत जात प्रमाणपत्रे व सामूहिक वनहक्कपट्टे वितरण

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

एटापल्ली:- जातीचा दाखला नसले की शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागते.योजनेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी जलद गतीने व अधिक सुलभरीत्या जातीचे प्रमाणपत्रे मिळावे हाच उद्देश असून ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेची पूर्ततेसाठी आपली धडपड सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते येथील उपविभागीय कार्यालयात रविवार 5 सप्टेंबर रोजी अनुसूचित जमातीच्या नागरिकांना जातीचे प्रमाणपत्रे व सामूहिक वनहक्क पट्टे वितरणाच्या कार्यक्रमात उदघाटनीय स्थानावरून बोलत होते.
अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधकारी तथा उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता (भा. प्र.से.) नायब तहसीलदार जनक काळबाजीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
उदघाटनीय स्थानावरून बोलतांना आ.धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीच्या दाखलाची गरज असते, जातीचा दाखला मिळविण्यासाठी गोरगरीब नागरिकांची मोठी दमछाक होते. त्यामुळे त्रास व पैशाची बचत व्हावी आणि शासन आपल्या दारी ही संकल्पना अधिक घट्टपणे रुजविण्यासाठी सदर उपक्रमे राबविण्यात येत असून अलीकडे एटापल्ली तालुक्यात जवळपास तेरा हजाराच्या वर जातीचे दाखले तयार करण्यात आले असून नागरिकांना ते सुरक्षितरित्या पोहचविण्याचे अविरत कार्य महसूल विभाग करीत असून उद्देश व उद्दिष्ट यशस्वीरीत्या पार पडत असल्याचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते जवळपास 50 जातीचे दाखले, सहा सामूहिक वनहक्क पट्टे व वयक्तिक एक वनहक्क पट्टा लाभार्थ्यांना देऊन जातीचे प्रमाणपत्रे व अन्य दाखल्यांचा शुभारंभ यावेळी करण्यात आले.
याच वेळी आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते कुटुंब अर्थ सहाय्य योजनेतून माला शंकर आत्राम व रत्नमाला विलास मोहूर्ले यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आले.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांनी, शासनाचे कल्याणकारी व लोकाभिमुख योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकांना मिळण्यासाठी खास करून भामरागड व एटापल्ली तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे या मुख्य उद्देशाने जातीचे प्रमाणपत्रे व अन्य दाखले मोठया प्रमाणात व तात्काळ बनवून देण्यात येत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार तलाठी गोकुळ वनकर यांनी केले.
यावेळी रा.काँ.चे तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर, सांबा हीचामी, जि. प.सदस्या ग्यानकुमारी कौशिक, महिला तालुकाध्यक्ष ललिता मडावी, पोर्णिमाताई श्रीरामवार, बेबीताई लेकामी, विनोद पत्तीवार आदी व महसूल विभागाचे कर्मचारी लाभार्थी उपस्थित होते.
बॉक्स
अनेकांनी कडेवर (कुशीत) प्रमाणपत्र प्राप्त केले
जातीचा दाखला प्राप्त करून घेण्यासाठी अनेक बालक आपल्या आईच्या कडेवर आले होते. नावाची घोषणा होताच आईच्या कडेवर(कुशीत) बालकांनी जातीचा प्रमाणपत्रे प्राप्त करून घेतले, यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम सुद्धा चिमुकल्यांना जातीचा दाखला देऊन कौतुक करीत होते. चिमुकले बालकांना जातीचा प्रमाणपत्र बहाल केल्याने कार्यक्रमात एक वेगळा आनंद व कुतुहुल तयार झाले होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close