रेती तस्करास मूल प्रशासनाचे अभय

अवैद्य रेतीसाठे जप्त करून लिलाव करा — निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर युवा वर्गची मागणी
तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
रेती तस्करी करून अवैध रेतीचा केलेला साठा शासनाने जप्त करून तो लिलाव करण्यात यावा अशी मागणी मूलचे युवावर्ग यांनी केली आहे.
रेतीचे प्रचंड प्रमाणात उत्खनन केले आणि मंजूर ब्रास पेक्षा कित्येक पट अधिक रेतीचा साठा करून ठेवला. घाट लिलाव झाले तेव्हा त्यांना किती आणि कुठे रेतीचे उत्खनन करावे याबाबत स्पष्ट करण्यात आले होते. मात्र कंत्राटदारांनी, त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणावरून रेती उत्खनन करण्याएवजी आपल्या सोयीच्या ठिकाणावरून रेतीचे उत्खनन करून अवैध साठा केला. त्याच वेळी मोठ्या प्रमाणावर रेती मार्केटमध्ये सुद्धा विकली.
सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर रेतीचे उत्खनन करू नये, रेतीचे उत्खनन करताना यांत्रिक साधनांचा वापर करू नये, असे स्पष्ट कायदे असताना, रेती तस्करांनी नदीत जेसीबी, पोकलेन लावून, हायवा द्वारे दिवस-रात्र रेतीची तस्करी केली आहे. ठिकाणी रेतीचे साठे तयार करून, मंजूर ब्रास पेक्षा अधिकची रेती उत्खनन केलेले आहे.
रेतीचे अवैध उत्खनन होत असताना वाहतूक होत असताना काढलेले फोटो, व्हिडिओ मूलचे तहसीलदारासह संबंधितांना देऊनही कोणतीच कारवाई केली नाही. मूल तालुक्यातील सर्व रेतीघाट हे विशिष्ट राजकीय पक्षातील नेत्यांकडे असल्याने, मूलची प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व रेती घाटाची मुदत 10 जुलैला संपलेली असतानाही जमा केलेला रेतीचे डोंगराएवढे स्टॉक कायम ठेवून अजूनही नदीतूनच अवैधरित्या रेतीची चोरी सुरू आहे. हा साठा अवैद्य असून मंजूरीपेक्षा अधिक उत्खनन केलेला असल्यांने, तो जप्त करून, लिलाव करण्यात यावा. अशी मागणी युवा वर्ग मूल यांनी केली आहे
मूल तालुक्यातील रेती उत्खननासाठी दिलेल्या रेती घाटाची मोजणी करण्यात यावी, मंजूरीपेक्षा इतर ठिकाणावरून, रेती उत्खनन करणारे कंत्राटदारांवर रेती चोरीचे गुन्हे दाखल करावे, आजपर्यंत वाहतूक केलेली रेती व करून ठेवलेला रेती साठा याची चौकशी करून, रेती तस्करावर कारवाई करावी, शासनाचे नियमाचे उल्लंघन करून, सुर्यादयापूर्वी आणि सुर्यास्तानंतर, यांत्रिक साधनांचा वापर करून, रेती उत्खनन करणार्यांवर व याबाबत पुराव्यासह तक्रारी देवूनही, रेती तस्करांना साथ देणारे प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाई करावी अशी मागणी युवा वर्ग मूलचे निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, निहाल गेडाम, सुरज गेडाम, धनजंय चिमुलवार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.