फार्मर कपच्या पार्श्वभूमीवर चिमूर तालुक्यातील शेतकरी निवासी प्रशिक्षणासाठी रवाना

प्रतिनिधी:हेमंत बोरकर
फार्मर कप २०२६’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची क्षमता वृद्धिंगत करणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन तसेच शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करण्याच्या उद्देशाने चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 7 ते 9 एप्रिल दरम्यान तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील नई तालीम समिती येथे पार पडत असून या प्रशिक्षणासाठी चिमूर तालुक्यातील एकूण 67 निवडक शेतकरी सहभागी होत आहेत. फार्मर कप स्पर्धेत प्रभावी सहभाग नोंदवता यावा, यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवासह सखोल मार्गदर्शन मिळावे, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
प्रशिक्षण कालावधीत नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य नियोजन, शाश्वत व स्पर्धात्मक शेती पद्धती, सामूहिक सहभाग तसेच उपलब्ध संसाधनांचा परिणामकारक वापर या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या माध्यमातून बदलत्या कृषी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यावर भर देण्यात येत आहे.
कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि उमेद विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी रवाना होताना शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आणि सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी उप कृषी अधिकारी विलास शेंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी बांदुरकर सर नम्रता मासुरकर सहाय्यक अधिकारी, ऋतुजा तुरणकर कृषी सहाय्यक अधिकारी नोडल , तालुका व्यवस्थापक विवेक हरणे, हेमचंद बोरकर उमेद नोडल अधिकारी , नितेश सागले पशु व्यवस्थापक उमेद, फिल्ड ऑफिसर अनिल पेंदाम, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तसेच मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रशिक्षणासाठी जाणारी गाडी रवाना करण्यात आली.
या प्रशिक्षणामुळे चिमूर तालुक्यातील शेतकरी फार्मर कप २०२६ साठी अधिक आत्मविश्वासाने सज्ज होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.









