पाथरीतील शाळा अनुदानाची १.५० कोटींची रक्कम परत

नगरपरिषदेच्या कारभारावर संशय
नगरसेविकेचा कारवाईचा इशारा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
नगर परिषद पाथरी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहरातील पीएम श्री जिल्हा परिषद शाळा,माळीवाडा या शाळेला मंजूर झालेला १.५० कोटी रुपयांचा निधी परत गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि परत गेलेला निधी पुन्हा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेविका सौ.रूपाली रंगनाथराव विरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माळीवाडा येथील या शाळेत ११६४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अपुऱ्या वर्गखोल्यांमुळे ही शाळा दोन सत्रांत भरवावी लागते.या समस्येवर उपाय म्हणून शासनाने शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी १.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र,शाळेच्या जागेचा ‘पी.टी.आर.’ (PTR) न मिळाल्याने टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही आणि अखेर हा मोठा निधी परत गेला.
नगरसेविका सौ.विरकर यांनी निवेदनात म्हटले आहे की,तीन महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात विद्यमान नगराध्यक्षांनी शाळेसाठी २७ गुंठे जागा दिल्याचे जाहीर केले होते.मात्र, त्यानंतर नगरपरिषदेने दिलेल्या पी.टी.आर.मध्ये विसंगती आढळली. एका पत्रात शाळेसाठी ४९३.७५ चौ.मी.जागा दाखवण्यात आली,तर प्रत्यक्ष जागेबाबत संदिग्धता निर्माण झाली. वारंवार पाठपुरावा करूनही मुख्याधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
पालकांमध्ये संताप, आंदोलनाचा इशारा:
शाळेच्या जागेचे मोजमाप करून ताबा मिळवून देण्याऐवजी नगरपरिषदेने बेजबाबदारपणा दाखवल्याचा आरोप सौ. विरकर यांनी केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.या प्रकरणाची त्वरित चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी,अन्यथा पालकांसह लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती शालेय शिक्षण मंत्री, नगर विकास उपसचिव, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना पाठवण्यात आल्या आहेत.









