वृद्धांच्या सेवेतुन साजरा झाला श्रद्धा बाहेतीचा वाढदिवस

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आजच्या धावपळीच्या आणि दिखाव्याच्या युगात वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती बदलत असून, सामाजिक भान जपत साजरा होणारे वाढदिवस समाजाला प्रेरणा देत आहेत. याचाच प्रत्यय श्रद्धा बाहेती हिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिला.
वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून शहरातील शिक्षक काॅलनी येथील दिपक बाहेती यांची मुलगी श्रद्धा बाहेती हिने पाथरी येथील ओंकार वृद्धाश्रम येथे आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि सेवाभावाने साजरा केला. यावेळी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना प्रेमाने भोजन वाढून त्यांच्यासोबत काही काळ संवाद साधत, त्यांचे आशीर्वाद घेतले.
वृद्धाश्रमातील रहिवाशांच्या चेहऱ्यावर यावेळी समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता. अनेक वृद्धांनी श्रद्धा बाहेती हिला शुभेच्छा देत “असे वाढदिवस अधिक लोकांनी साजरे करावेत,” अशी भावना व्यक्त केली.
या उपक्रमातून वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे किंवा पार्टी करणे नसून, गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हेच खरे सेलिब्रेशन आहे, असा सामाजिक संदेश देण्यात आला. श्रद्धा बाहेती हिच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, तरुण पिढीसाठी हा आदर्श ठरत आहे.









