जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जाणुन घेतल्या दिव्यांग बांधवांच्या समस्या

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि. 31 /12/2025 दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आज स्वत: दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी, सक्षम व सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी दिव्यांग सक्षमीकरणावर निश्चितपणे भर देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी आर.व्ही. चकोर, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, सहायक दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पी.एम. लांडे आदींसह दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या विविध संस्था, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि दिव्यांग नागरिक उपस्थित होते.दैनंदिन जीवनात दिव्यांग व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यांच्या समस्यांचे शासनाकडे पाठपुरावा करुन निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी बैठकीत उपस्थितांच्या अडचणी जाणुन घेतल्या. दिव्यांगांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिव्यांगांना सुलभपणे कसा मिळेल, यावर चर्चा झाली.दिव्यांगांना देण्यात येणारे विविध प्रमाणपत्र, युडीआयडी कार्ड यासह जिल्हा व ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांना सहजपणे सुविधा व उपचार मिळण्यासाठी योग्य नियोजन केले जाईल, अशी ग्वाही देऊन जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हयातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारकांची तपासणी करुन त्यांच्याविरुध्द योग्य ती कार्यवाई केली जाईल व खऱ्या व गरजू दिव्यांगांना लाभ कसा मिळेल, याची दक्षता घेतली जाईल. दिव्यांगांचे शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्य विकास व आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जातील.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांच्या कल्याणासाठी असणारा पाच टक्के निधी प्राधान्याने खर्च करण्यात यावा. घरकुलापासुन वंचित दिव्यांगांचा निवाऱ्याचा प्रश्न, आरोग्य तपासणीचे प्रमाणपत्र स्थानिक स्तरावर मिळणे, दिव्यांगांना व्यवसायासाठी गाळे मिळावेत, अंत्योदय योजनेत दिव्यांगांना प्राधान्याने शिधाचे वाटप व्हावे. दिव्यांगांसाठी रोजगार मेळावे भरविणे, दिव्यांगांचे प्रलंबित पुरस्कार वितरण, दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, दिव्यांगासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करणे, दिव्यांगाच्या मानधनात वाढ करणे, दलालांकडून दिव्यांगांची लूट थांबविणे आदी समस्या यावेळी संस्थेचे पदाधिकारी व दिव्यांग नागरिकांनी मांडल्या.शेवटी दिव्यांगांच्या समस्या बैठकीच्या माध्यमातून जाणुन घेतल्याबद्दल उपस्थित संस्थेचे प्रतिनिधी व दिव्यांग नागरिकांनी जिल्हाधिकारी यांचे विशेष आभार मानले.









