शाळेच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय यश – शिवाजी पब्लिक स्कूल भिसीचा अभिमान

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
भिसी येथील शिवाजी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तर व विदर्भस्तरीय जित कुने दो स्पर्धेमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय जित कुने दो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत –
नमन नीरज मिश्रा, आर्या पारधी, कृणाल डेकाटे व वेदांत गलगले.
या सर्व विद्यार्थ्यांना डॉ. सुशांत इंदोरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष श्री नितेश उघडे , मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर शिरभये, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अविनाश बोरकर, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
निवड झालेले विद्यार्थी लवकरच सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सहभाग घेणार असून त्यांच्याकडून शाळेला मोठ्या अपेक्षा आहेत.
याचबरोबर शाळेतील शैक्षणिक उपक्रमही सातत्याने राबवले जात असून इयत्ता ८ वी व १० वी साठी प्रश्नपत्रिका निर्मिती, युनिट टेस्ट, सामान्य ज्ञान, गणित व इंग्रजी विषयातील सराव पेपर तयार करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे यावेळी प्रशासनाने स्पष्ट केले.
शिवाजी पब्लिक स्कूल भिसीचे हे यश विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य व शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा सुंदर संगम असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.









