डॉ. अजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा अभिनव प्रकल्प स्टार्ट-अपमध्ये रूपांतरित : स्त्रियांच्या मासिक पाळीतील वेदनेवर ‘क्रेवमोर’ चॉकलेट्सचा शुभारंभ

दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी, नागपूर येथे प्रो. डॉ. अजय पिसे, फार्मास्युटिकल रेग्युलेटरी अफेअर्स विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखालील औषधनिर्माण शास्त्रातील पीएच.डी., पदव्युत्तर व पदवीचे विद्यार्थी यांनी आपला संशोधन प्रकल्प प्रत्यक्ष स्टार्ट-अपमध्ये रूपांतरित करत एक आगळावेगळा उपक्रम साकारला आहे. या विद्यार्थ्यांनी महिलांच्या आरोग्याचा विचार करून ‘क्रेवमोर’ चॉकलेट्स विकसित केले असून, ते मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
डॉ. अजय पिसे यांनी विद्यार्थ्यांना कल्पनेपासून प्रत्यक्ष बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा संपूर्ण प्रवास मार्गदर्शनातून घडवून आणला. त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक काम थेट व्यावसायिक उत्पादनात व उद्योजकतेत रूपांतरित झाले. क्रेवमोरच्या फॉर्म्युलेशनमध्ये डॉ. अजय पिसे व त्यांच्या विद्यार्थांनी पारंपरिक ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधत महिलांसाठी आरोग्यदायी व स्वादिष्ट पर्याय उपलब्ध करून दिला.
या लाँच कार्यक्रमाला श्री. मनोज बालपांडे (चेअरमन, बालपांडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स) यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शशिकांत चौधरी (inFED, IIM नागपूर), डॉ. सुजीत मेत्रे, डॉ. पुष्पहास बल्लाळ, डॉ. उज्वला महाजन आणि डॉ. देवेश्री नंदुरकर उपस्थित होते. या प्रकल्पात सहभागी नवाझिश खान, राज आचरे व गायत्री तिवसकर यांचा सन्मान करण्यात आला.
या उपक्रमामुळे विदर्भातील शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम व स्टार्ट-अप संस्कृती रुजविण्याचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण करत आहेत. डॉ. अजय पिसे यांचे नेतृत्व व मार्गदर्शन हेच या यशामागील मुख्य बळ ठरले असून, त्यांच्या शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी व नव्या पिढीतील उद्योजक घडविण्याच्या प्रयत्नांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.