समाजातील सामाजिक चेतना हरवणे गंभीर बाब – भूपेश पाटील

साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्कार वितरण समारंभ
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
महापुरुषांनी दिलेली चेतना आजचा समाज हरवून बसल्याने सामाजिक प्रश्नांची भीषणता वाढत चालली आहे. गौतम बुध्दांनी दिलेली चेतना कबीरापासून ते तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज, गाडगेबाबा पर्यंत झिरपली.मात्र २१ व्या शतकातील समाज संवेदनशीलता आणि चेतना दोन्ही गमावून बसल्याने माणुसकी रोज मरत आहे.
सर्वार्थाने अशा काळात स्वतःच्या संपत्तीचा आणि बुद्धिमत्तेचा फायदा पुन्हा श्रीमंत होण्याकरिता न वापरता समाजाच्या उत्थानाकरिता वापरणे ही असामान्य बाब आहे त्यामुळेच ज्यांनी आयुष्यभर समाजात चेतना जागवण्याचे काम केले त्या साने गुरुजींचे नावे दिला जाणारा पुरस्कार योग्य व्यक्तींना दिला जात आहे असे प्रतिपादन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक ऍड.भूपेश पाटील यांनी केले.
स्वातंत्र्य सेनानी,महान साहित्यिक,महाराष्ट्र माऊली साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवा दल,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान,समता सैनिक दल,राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शिक्षक भारती,छात्रभारती आणि समविचारी संस्था, संघटना यांचे समन्वयातून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या निरालस कार्यकर्त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय चिमूर येथे आयोजित सोहळ्यात सामाजिक चेतना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर तालुका कार्याध्यक्ष प्रभाकर पिसे होते.प्रमुख अतिथी म्हणून वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक ऍड.भूपेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते डॉ.आशिष पाटील,सामाजिक कार्यकर्ते महादेवराव पिसे,धम्मचारी पद्मरत्न, मारोतराव अतकरे,तुळशीराम महल्ले उपस्थित होते.
साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्कार विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाहुण्यांचे हस्ते सन्मानचिन्ह, शाल आणि पुस्तक देऊन गौरविण्यात आले.यात प्रामुख्याने सामाजिक प्रबोधन आणि विद्यार्थ्यांसाठी ‘संडे स्कूल’ची संकल्पना राबविणारे सामाजिक कार्यकर्ते समता सैनिक दलाचे हरी मेश्राम,ओबीसींमध्ये जनजागृतीचे कार्य करणारे आणि मूकबधिर विद्यार्थ्यांची शाळा चालविणारे रामदास कामडी,मतीमंदांच्या पुनर्वसनाचे कार्य करणारे शुभम पसारकर,आत्मसंरक्षणासाठी कुंग फु कराटेचे प्रशिक्षण देणारे डॉ.सुशांत इंदूरकर यांना सामाजिक चेतना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण समारंभाचे प्रास्ताविक सुरेश डांगे यांनी केले. संचालन कैलाश बोरकर यांनी तर आभार रावन शेरकुरे यांनी मानले.पुरस्कार वितरण समारंभाकरिता राष्ट्र सेवा दल,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान,समता सैनिक दल,राष्ट्रीय ओबीसी महासंघ,शिक्षक भारती,छात्र भारती तथा मूकबधिर विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.