उच्च शिक्षणाबाबतची धारणाच चुकीच -प्रा. शरद बाविस्कर
प्रा. शरद बाविस्कर
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
प्राध्यापक, डॉक्टर, इंजीनियर, सनदी अधिकारी, वकील, होण्यासाठी दिलं जाणारं शिक्षण म्हणजेच उच्च शिक्षण म्हणता येणार नाही. त्यातून त्या त्या क्षेत्रातील कुशल कार्य करणारे हातच निर्माण होत असतात. त्यांच्या कार्याला स्वकेंद्रीतपणा बाधित करीत असतो आणि वस्तुनिष्ठतेचा अभाव दिसून येतो. लोकशाही मुल्यांची उच्च धारणा त्यात अभावानेच दिसून येते. केवळ आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुलांना त्या तालमीत घडविण्याचे शिक्षण पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून देऊ शकते. त्यांच्या व्यक्तिमत्वाला उत्तुंग बनविण्यासाठी उच्च मुल्यांचे बिजारोपण जोपर्यंत आपण करू शकत नाही तोपर्यंत ते शिक्षण ख-या अर्थाने उच्च होऊ शकत नाही. लोकशाहीला हेच मोठे आव्हान आहे. म्हणून सर्वच शाखांतील उच्च शिक्षितांना सामाजिक शास्त्रांची आणि तत्वज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे. ” असे प्रतिपादन उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने’ या विषयावर बोलताना प्रा. शरद बाविस्कर यांनी केले.
२१ जुलैला मराठा सेवा संघ चंद्रपूर द्वारा प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे गुणवंत विद्यार्थी गौरव कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख मार्गदर्शक प्रा. शरद बाविस्कर यांनी उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले. ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, येथे फ्रेंच भाषा आणि तत्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक असून प्रख्यात ‘भुरा” या कादंबरीचे नामवंत लेखक आहेत.
याप्रसंगी विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघ, उद्घाटक मारोतराव झोटिंग, प्रमुख पाहुणे मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष इंजि. दिपक खामनकर, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा अर्चना चौधरी, चांदा पब्लिक स्कूल च्या संचालिका स्मिता जीवतोडे, प्रा. बबनराव राजूरकर, चंद्रपूरातील विविध अभ्यासिकांचे संचालक उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते १०-१२वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. दरवर्षी प्रा. बबनराव राजूरकर यांचे कडून त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि. दिपक खामनकर, मार्गदर्शकाचा परिचय प्रा. दिलिप चौधरी, सुत्रसंचालन शितल चव्हाण आणि अर्चना सातपुते यांनी केले. करिष्मा कुरेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, नागरिक, संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.