कालव्यातून जायकवाडीचे पाणी मुदगल बंधाऱ्यात सोडण्याची आ. वरपुडकरांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी व सोनपेठ तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न – सोडवण्यासाठी मुदगल उच्च पातळी बंधाऱ्यात जायकवाडीच्या बी- ५९ कालव्या मधून तत्काळ पाणी सोडावे अशी मागणी आमदार सुरेश वरपुडकर यांनी एका पत्राद्वारे परभणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
यंदा सरासरीच्या ६१ टक्के एवढा पाऊस झाल्याने पाथरी तालुक्यासह उपविभागातील परिस्थिती गंभीर झाली आहे. तालुक्यातील तीनही उच्च पातळी बंधाऱ्यांमधील पाणी पातळी जोत्याखाली गेली आहे. जायकवाडीचे पाणी या उच्च पातळी बंधाऱ्यात सोडून पाणी टंचाई काही अंशी कमी करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांतून मागील अनेक दिवसां पासून होत आहे. यासंदर्भात आता पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बुधवार १० एप्रिल रोजी पत्रा व्दारे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यात तालुक्यातील मुदगल उच्च पातळी बंधाऱ्यालगतच्या गोदावरी नदीकाठावरील अनेक गावांसह सोनपेठ शहराला पिण्याचा पाणीपुरवठा मुदगल बंधाऱ्यांतून होतो. गोदावरी नदीपात्रात अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहीरी आहेत. सद्यस्थितीत मुदगल बंधारा पूर्ण कोरडा पडल्याने पाणी उपलब्ध नसल्यामुळे नदी काठावरील सोनपेठसह गोदावरी नदी काठावरील २० ते २५ गावांत पाणी पुरवठा सुरळीत नाही असे निदर्शनास आणून देत बी ५९ या कालव्यावर येणाऱ्या गावातील नदी नाल्यात पाणी सोडून वन्य प्राण्यासह पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी व गोदावरी नदीकाठा सह पाथरी, बाभळगाव मंडळातील गावांना पाणी मिळावे व पाणी टंचाई दूर व्हावी या उद्देशातून जायकवाडीच्या मुख्य कालव्यातून बी – ५९ चारीव्दारे फुलारवाडी येथून गोदापात्रातील मुदगल बंधाऱ्यात तत्काळ पाणी सोडण्यासाठी संबंधीतास आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.