अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करा, उन्हाळी पिकांना चिचडोहचे पाणी द्या
खा.अशोक नेते यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
वादळी वाऱ्यासह बरसलेल्या अवकाळी पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागात शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी खा.अशोक नेते यांनी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्याकडे केली. याशिवाय चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे उन्हाळी पीक पाण्याअभावी करपत आहे. त्यासाठी चिचडोह बॅरेजचे पाणी सोडावे, अशीही मागणी त्यांनी केली.
खा.नेते यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी दैने यांची भेट घेतली. जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मंगळवारच्या रात्री झालेला वादळी पाऊस जास्त नुकसानकारक होता. त्यामुळे अनेक भागात मक्यासह इतर पीक उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात तातडीने पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याची गरज आहे, अशी मागणी यावेळी खा.नेते यांनी केली.
यासोबतच चिचडोह बॅरेजचे पाणी मिळेल या आशेने चामोर्शी तालुक्यातील परिसरात विशेषत: भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली आहे. त्यांच्या धानाला पाण्याची गरज असताना पाणी उपलब्ध नसल्याने धानपीक करपत आहे. याबाबत भाजपच्या सहकार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे यांच्या नेतृत्वात अनेक शेतकऱ्यांनी खासदार नेते यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या भेटीत याबाबतची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांना देऊन खासदारांनी चिचडोह बॅरेजचे पाणी शेतीसाठी सोडावे, अशी सूचना केली.