ताज्या घडामोडी

सर्पदंशाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी अपघात विमा योजना शासनामार्फत सुरु करण्याची मागणी

तालुका प्रतिनिधीः कल्यानी मुनघाटे नागभीड

शेती नसलेल्या व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी अपघात विमा योजना शासनामार्फत सुरु करण्याची मागणी चंद्रपुर जि.प. चे माजी सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी शासनाकडे केली असुन याबाबतचे निवेदन राज्याचे वनमंत्री नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना दिले आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सर्पदंशाच्या अनेक घटना घडत असतात व त्यात शेतात काम करणारे शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू होत असतो. यात मृत्युमुखी पडलेले काही शेतकरी आहेत तर काहींच्या नावे शेती नाही. शेतकऱ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यास स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ मिळतो, मात्र शेती नसलेल्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यास त्यांना आर्थिक मदतीची कोणतीही योजना नाही.
जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून २५ लक्ष रुपयाची मदत दिल्या जाते तसेच जखमी झालेल्यांनाही मदत करण्यात येते. शिवाय स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभही देण्यात येतो. मग शेती नसलेल्या व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई का देण्यात येऊ नये असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
सर्पदंशाने मृत्यू झालेले पण शेती नसलेले काही व्यक्ती या कुटुंब प्रमुख होत्या व त्यांच्यावरच संपूर्ण कुटुंब अवलंबून होते. कुटुंब प्रमुखाच्या अशा अकाली मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आलेले आहेत. उघड्यावर आलेल्या या कुटुंबास मदतीचा हात म्हणून स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या धर्तीवर एखादी योजना शासनाने अमलात आणण्याची गरज आहे. याबाबत शासनाने तातडीने अशाप्रकारची मदतीची योजना जाहीर करुन ग्रामीण भागातील शेतमजुर व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी चंद्रपुर जि.प. चे माजी सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close