मोफत डिजिटल सातबारा मोहिमेचा आ दुर्रानी यांच्या हस्ते शुभारंभ

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी:-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त मोफत डिजिटल सातबारा वितरण मोहिमेचा प्रारंभ २ ऑक्टोबर शनिवार रोजी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते येथे करण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांना मोफत डिझीटल सातबाराचे वाटप करण्यात आले. २ ते १५ ऑक्टोबर दरम्यान या विशेष मोहिमे अंतर्गत गावागावात शेतकऱ्यांना घरपोच डिजिटल सातबाराचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने प्रत्येक शेतकऱ्यास मोफत डिजिटल स्वाक्षरीत सुधारीत सातबारा वाटप मोहीम २ ते १५ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेचा प्रारंभ पाथरी तालुक्यात शनिवारी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला. आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते पाथरी व माळीवाडा सज्जातील शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा वाटप करून या विशेष मोहिमेचा शुभारंभ झाला.
यावेळी पाथरीचे तहसीलदार श्रीकांत निळे, नायब तहसीलदार सुभाष कट्टे, पाथरी मंडळ अधिकारी भरकड,माळीवाडा साजाचे तलाठी जमशेठे, पाथरी सज्जाचे तलाठी प्रधान, नगर परिषदेचे बांधकाम सभापती गोविंद हारकळ, माजी नगरसेवक शे.मुस्तफा, दिलीप ढवळे, प्रशांत चौधरी यांच्यासह तहसील कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते उपस्थित शेतकऱ्यांना डिझिटल स्वाक्षरीत सातबाराचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी आ. बाबाजानी दुर्राणी, तहसीलदार श्रीकांत निळे यांनी शेतकऱ्यांना डिझिटल सातबारा वाटप मोहिमेसंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तहसील कार्यालयाचे सुरेश पुंड यांनी केले. कार्यक्रमास शेतकऱ्यांची उपस्थिती होती. शनिवारी २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल विभागाच्या वतीने प्राथमिक स्वरूपात पाथरी तालुक्यातील पाथरी व माळीवाडा सज्जातील जवळपास २०० शेतकऱ्यांना या डिझिटल सातबाराचे वाटप करण्यात आले. महसूल विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मोफत सातबारा वितरण विशेष मोहिमे अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यास घरपोच मोफत डिजिटल स्वाक्षरीत सातबारा वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली.