ताज्या घडामोडी

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूर ला पहिलेच निवेदन अंशकालीन कर्मचाऱ्यांचे: कंत्राटी नोकरी ची मागणी, आत्मदहनाचा इशारा

उपसंपादकः विशाल इन्दोरकर

चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होऊन काही दिवस झाले. या कार्यालयात सर्वप्रथम आलेले निवेदन हे पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना चंद्रपूरच्या चिमूर तालुका कार्यकारिणीचे हे विशेष. दि. १०/०८/२३ ला दिलेल्या या निवेदनात पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी नोकरी मध्ये समाविष्ट करून घेण्याची कळकळीची मागणी केलेली आहे.
निवेदनामध्ये शासनाने वेळोवेळी काढलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचारी पदभर्तीच्या परिपत्रकांवर प्रकाश टाकला. मागील चार पाच वर्षांपासून एवढी परिपत्रके फक्त काढली परंतु त्याच्या अंमलबजावणीवर जाणीवपूर्वक शासन दुर्लक्ष करीत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे वेतन देण्यासाठी पैसे नाहीत अशी हास्यास्पद कारणे देऊन आम्हाला कंत्राटी नोकरीपासून वगळने तर दुसरीकडे ९ खाजगी कंपन्यांना पदभर्तीचे कंत्राट देऊन त्यांना अमाप पैसा कमावून देण्याचे दुटप्पी धोरण सरकार राबवित आहे. या खाजगी कँपणीमार्फत बड्या पगाराच्या पदभरती सरकार करीत आहे तेव्हा त्यांच्या वेतनासाठी पैसा कसा आहे? यावरून सरकार हेतुपुरस्सर पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना डावलत आहे. अंशकालीन कर्मचारी संघटनांकडून वारंवार पत्रके व निवेदने दिले असूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाचे विविध कार्य पूर्ण करण्यास मदत करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर सरकार अन्याय करीत आहे.
म्हणून प्रशासनातील ‘क’ व ‘ड’ श्रेणी पदे बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून भरतांना प्रथम अंशकालीन ला वैयक्तिक स्वरूपात निवड करून १६ मार्च २०२३ च्या ऊर्जा व वनविभागाच्या निकषांप्रमाणे वेतन द्यावे अशी मागणी केली आहे. करिता ऑगस्ट महिन्याच्या आत सदर भरती न केल्यास चिमूर तालुका पदवीधर अंशकालीन संघटना ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करेल असा इशारा निवेदनात दिलेला आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना संघटनेचे राष्ट्रपाल डांगे, प्रकाश पाटील, भारत बोकडे, माणिक पिसे, अशोक बुढे, राजेंद्र नन्नावरे व पतृ पाटील उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close