शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी बहुजन क्रांती मोर्चाचे मुख्याधिकारी नगर परिषद पाथरी यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी शहरातील राष्ट्रीय महामार्ग ६१ रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली असून वाहचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम पालिकेकडून सातत्याने राबवली जात नसल्याने या जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवरील या जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त झाला आहे.
मागील अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढत असताना त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत नाहीत.
कल्याण ते निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग ६१ पाथरी शहरातून जातो. शाहरातील माजलगाव रोड,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळील चौक, शासकीय विश्राम गृह, सेंट्रल नका,बस स्टँड, सेलू कॉर्नर तसेच पोखरणी फाटा,परभणी रोड, अशा वेगवेगळ्या भागांमधील रस्त्यांवर तर जणू काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावरून कृषी उत्पन्न बाजार समिती, उपजिल्हा रुग्णालयासह,शाळा, महाविद्यालयकडे जाणारे रस्ते जोडलेले आहेत. तसेच मुख्य बाजार पेठ,पंचायत समिती, तहसील कार्यालय,पोलिस स्टेशन आणि बस स्टँड ला जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते; मात्र, या रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे येथे अनेकदा वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो. त्यामधून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे. या भागात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असल्यामुळे अनेकदा वाहतूक खोळंबते.त्यामुळे त्याचा नागरिकांनाही त्रास होत आहे.सोशल मीडिया वर सुद्धा यावर प्रतिक्रिया येत आहेत. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर यावर कार्यवाही करावी.अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चा,पाथरी तालुका संयोजक नितीन कांबळे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद,पाथरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी लहुजी क्रांती मोर्चा,डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया,मनसे तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.