ब्रम्हपुरी येथे कोतवाल पदभरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप ! नव्याने परीक्षा घ्या- परीक्षार्थ्यांनी केली मागणी
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे दि.१५ जूनला झालेल्या कोतवाल पदभरती परीक्षेत परिक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत झालेली परीक्षा रद्द करून पुनश्च परीक्षा घेण्याची मागणी परिक्षार्थीनी आयोजित केलेल्या एका पत्रपरिषदेत केली.
या बाबतचे निवेदन त्यांनी उपविभागीय अधिकारी मार्फत महाराष्ट्राचे महसूल मंत्री विभागीय आयुक्त नागपूर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविण्यात आले असल्याचे काही परीक्षार्थ्यांनी सांगितले.
कोतवाल भरतीची परीक्षा दि. १५ जूनला शहरातील एका महाविद्यालयात घेण्यात आली.
काही परीक्षार्थ्यांचे रोल नंबर चुकले असता त्यांना दुसऱ्या उत्तरपत्रिका देण्यात आल्या. याच दिवशी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालामध्ये ज्यांनी कोऱ्या उत्तरपत्रिका दिल्या त्यांची निवड करण्यात आली असून ज्या विद्यार्थ्यांचे पेपर उत्तम गेले त्यांना कमी गुण देऊन डावलण्यात आल्याचा आरोप परीक्षार्थ्यांनी केला आहे.
या भरती प्रक्रिया मध्ये ज्यांनी आर्थिक देवाण घेवाण केली त्या परीक्षार्थ्यांची निवड झाल्याचा आरोप करत सदरहु परीक्षा तात्काळ रद्द करावी व नव्याने परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. प्रशासनाने मागणी मान्य न केल्यास आमरण उपोषणाचा इशाराही परीक्षार्थ्यांनी दिला आहे.या तक्रारी मुळे अनेकांचे लक्ष या कडे वेधले आहे.