प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या चित्ररथाला हिरवा झेंडा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा-अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे
दि. 13 /02/2023 सोमवार रोजी कृषि उत्पादनांवर आधारित कृषिपूरक उद्योग उभारणीतून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावता येतो. त्यामुळे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये जास्तीत -जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि विभागाच्या चित्ररथास आज त्यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.
कृषि उपसंचालक बळीराम कच्छवे, ‘एसबीआय’ चे मुख्य व्यवस्थापक शशी रंजन नारायण उपस्थित होते.
अन्नावर प्रक्रिया करणा-या वैयक्तिक स्वरुपातील उद्योगांना ५० तर बचत गटांना ३५ टक्के अनुदान मिळते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवळ कृषि उत्पादनावरच न थांबता कृषि मालावर प्रक्रिया करणारे उद्योजक बनावे, असे सांगून अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी कृषि विभागाच्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवला. हे तीन चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आठवडाभर फिरून शेतकऱ्यांना कृषिमालावर आधारित उद्योजक बनण्यास प्रेरित करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कृषि मालापासून विविध अन्नप्रक्रिया उद्योग उभारणी व्हावी, हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून बेकरी, तेलघाणा, दाळ प्रक्रिया, गुळ आदी उद्योग शेतकरी, शेतमजूर महिला, शेतकरी गट, महिला बचत गट किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना सहभागी होऊन उभारता येऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असून, या योजनेत ३५ टक्के अनुदान केंद्र सरकारतर्फे दिले जाते. त्यासाठी सर्व प्रकरणे जिल्हा संसाधन व्यक्तीकडून तयार होऊन बँकेकडे जातात, त्यांना बँकेने लोन मंजूर केल्यानंतर अनुदान दिले जाते, असे कृषि उपसंचालक बळीराम कच्छवे यांनी याप्रसंगी सांगितले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेची माहिती व्हावी, यासाठी तीन चित्ररथ आठवडाभर जिल्ह्यात फिरणार आहेत. यामध्ये डीआरपी आत्मा, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, कृषि सहायक मार्गदर्शन करत आहेत, अशी माहिती संनियंत्रण अधिकारी तथा उपसंचालक बळीराम कच्छवे यांनी दिली आहे.