ताज्या घडामोडी

चंदनखेड्यातील अवैध दारु विक्री बंद करा -एका शिष्टमंडळाने घेतली चंद्रपूर जिल्हाधिका-यांची भेट !

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तहसील अंतर्गत मोडणा-या चंदनखेडा या गावात अक्षरशः दारूचा महापूर आला असून अवैध दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे खुलेआम बोलल्या जाते . या नित्य अवैध दारु विक्री मुळे गावातील पुरुषांसोबतच आता महिला व तरूणींना त्रास होवू लागला आहे.दरम्यान मंध्यंतरी याच गावातील एका बहुचर्चित अवैध दारु विक्रेत्याने गावातील युवा सरपंच नयन बाबाराव जांभूळे यांचेवर हल्ला केला.या बाबतीत भद्रावती पोलिस स्टेशनला तक्रार दाखल झाली असल्याचे समजते.अवैध दारु मुळे गावात गुंडगिरीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून गावातील शांतता भंग होवू लागली आहे.गेल्या कित्येक दिवसांपासून या गावातील पोलिस पाटलाचे पद रिक्त असून ते अद्याप उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी भरले नाही.त्यामुळे गावातील होणा-या भानगडी जलद गतीने पोलिस विभागा पर्यंत पोहचू शकत नाही.गावातील दारु विक्रेते खुलेआम व राजरोसपणे अवैध दारु विकत असल्यामूळे (दारु )पियक्कडांची हिंमत वाढली आहे.त्यांचा ही त्रास गावातील महिला, विद्यार्थी व विद्यार्थीनींना होवू लागला आहे.दारु विक्रेता व पिय्यकडांना कोणाचाही धाक आता उरलेला नाही.असे चित्र सध्याच्या घडीला चंदनखेडा गावात बघावयास मिळत आहे.गावात या पुढे शांतता भंग होवू नये व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज सोमवार दि.१४नोव्हेंबरला दुपारी १वाजता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना सांसद आदर्श ग्रामपंचायत चंदनखेडा यांचे वतीने एक लेखी निवेदन सादर करण्यात आले.या वेळी ग्राम ग्रामपंचायत सरपंच नयन बाबाराव जांभूळे , तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोहर हनवंते ,ग्रा.प.सदस्या प्रतिभा दोहतरे , ग्रा .प. सदस्या मुक्ता सोनुले ,गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक उत्तमराव झाडे ,गुलाबराव भोयर , नागोराव ठावरी , श्रीराम सोनूले ,निर्मला चौखे ,सुनंदा हनुवंते ,पार्वताबाई सोनूले आदीं उपस्थित होते.येत्या काही दिवसांत पोलिस प्रशासनाने या गावातील अवैध दारु विक्री बंद केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी या वेळी दिला आहे.या दारु विक्रेता कडे भद्रावती पोलिस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप काहींनी आपल्या बोलण्यातून केला आहे.सध्याच्या अवस्थेत चंदनखेडा हे गांव अवैध दारु विक्रीचे एक केंद्र बनले असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या कडे जातीने लक्ष पुरविणे गरजेचे व तेव्हढेच आवश्यक झाले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close