पुरुषसत्ताक मानसिकता बदलण्याची गरज-डॉ. प्रविण मुधोळकर
आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथे जागतिक महिला दिनी प्रतिपादन.
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
आतापर्यंत परंपरेने वारसा हक्क म्हणून मिळणारी पुरुषसत्ताक मानसिकता बदलण्याची गरज असून उद्याच्या लिंगभाव मुक्त समाज निर्मितीसाठी त्यांच्यावर विद्यार्थी दशेतच संस्कार होणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन महिला अध्ययन विषयाचे अभ्यासक डॉक्टर प्रवीण मुधोळकर यांनी केले. आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदवन येथे आयोजित जागतिक महिला दिनाच्या पर्वावर ॔उद्याच्या स्त्री-पुरुष समानतेवर आधारित समाज निर्मितीमध्ये माझी भूमिका या विषयावर प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते . याप्रसंगी मंचावर महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्याताई टोंगे,मुख्य अतिथी राजेश ताजणे,शिक्षक प्रदीप कोहपरे, मयूर सर,आशिष येटे सर , स्मिता मॅडम,निशा मॅडम उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की स्त्रिया अनेक जबाबदाऱ्या सांभाळतात परंतु त्याचे कुठलेही मोल केल्या जात नाही. कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीसाठी स्त्रीला योग्य मान दिला गेला पाहिजे.बाबा आमटे यांनी साधनाताईंना सह्योगिनी आणि मित्र म्हणून दिलेला सन्मान आनंदवनाच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरला. प्रत्येक जागतिक सन्मानाच्या वेळी बाबांनी आपल्या भाषणात साधना ताईंच्या नावाचा सर्वप्रथम उल्लेख करणे हे स्त्री-पुरुष समानतेचे आदर्श उदाहरण होय.या समान वागणुकीमुळेच ताईंनी आनंदवन निर्मितीच्या प्रक्रीयेत महत्वपूर्ण भूमिका निभावली. आनंदवनातील कुष्ठ बाधित स्त्री-पुरुषांच्या विवाहास संमती मिळण्यासाठी त्यांनी दाखवीलेले धाडस हे महिला सक्षमीकरणाचे मोठे उदाहरण होय. भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांचा दर्जा, कुटुंबातील लिंगभावना आणि त्यांच्यात काळानुसार झालेले परिवर्तन या विविध मुद्द्यांवर त्यांनी विविध उदाहरणाद्वारे प्रकाश टाकला. आजच्या गतीशील काळात आपल्या घरातील आई बहिणींच्या श्रम आणि कौशल्यांचा आदर करून त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ राहिले पाहिजे .असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आनंदवनाचे राजेश ताजणे म्हणाले की अलीकडच्या काळात विद्यार्थिनींच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीची होणारी घसरण ही चिंता व चिंतनाची बाब आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळाची पावले ओळखून स्वतः मध्ये बदल करावा.याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत आणि नववीतील पुस्तकावर आधारित एक नाटिका सुद्धा सादर केली या प्रसंगी मयुर गोवारदिपे या शिक्षकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजनाने करण्यात आली कार्यक्रमाची प्रस्तावना येटे सरांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रदीप कोहपरे यांनी आणि कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन येटे सरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.