ताज्या घडामोडी

संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा – आ.गुट्टे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि.२८ सप्टेंबर मंगळवार, गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी अतिवृष्टीने बाधित पिकांचे सरसगट पंचनामे करून गंगाखेड विधानसभा मतदारसंघ व परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी जाहीर करून शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कृषिमंत्री मा.ना. दादा भुसे व जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे केली आहे.
यावर्षी पावसाने सर्वत्र अगदी धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली असून हेच चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी साचल्याने मूग,उडीद, ज्वारी, बाजरी,सोयाबीन, कापूस इत्यादी पिकासह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. नदी व ओढ्याकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिके व गुरंढोरं पाण्याबरोबर वाहून गेली. नदीकाठच्या पिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाने आदेश दिले. परंतु याशिवाय इतरत्रही अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गंगाखेड तालुक्यात २३१.७० टक्के, पालम तालुक्यात २२९.१० टक्के व पूर्णा तालुक्यातील १६५.३० टक्के प्रजन्य झाले आहे. काढणी योग्य झालेली पिकं पावसाने हातची गेल्याने बळीराजा निसर्गापुढे हवालदिल झाला असून त्याचा भविष्यातील उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे येणाऱ्या १५ दिवसात नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून गंगाखेड विधानसभा मतदारसंघ व परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन दि. १६ ऑक्टोबर शनिवार रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल व पुढील परिणामास सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार असेल असे मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,कृषी मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी म्हटले आहे.
मा. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना जि.प.सदस्य राजेश फड, पंचायत समिती सभापती मुंजाराम मुंढे,पं.स. सदस्य मगर पोले, नितीन बडे, जिल्हा प्रभारी सुरेश दादा बंडगर, गंगाखेड तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, गंगाखेड तालुका अध्यक्ष शिवाजी पवार, अखिल भाई अन्सारी, जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे यांच्यासह आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close