ताज्या घडामोडी

गाव विकासासाठी शिवार फेरी

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी

चिमूर तालुक्यातील बोधली येथे गावाच्या विकासाबरोबरच ग्रामीण तरुणांना रोजगार मिळावा याकरिता महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षाकरिता समृद्धी आराखडा तयार करण्याकरिता शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तहसीलदार, जिल्हाधिकारी, वनविभाग अधिकारी, कृषी विभाग अधिकारी, पंचायत समितीचे इमारत व दळणवळण अधिकारी अशा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शिवारफेरीची सुरुवात केली जाते. यामध्ये तीन टप्प्यात कामाचे विभाजन केले जाते. पहिल्या टप्प्यात गावाच्या उंच टेकडीवर जाऊन माथा ते पायथा पर्यंतचे नियोजन करण्यास सुरुवात होते. माथ्यावर जाऊन पाणलोट नकाशा, गाव नकाशा, वनविभागाचा टोपोशिट नकाशा घेऊन गावाचे अवलोकन केले जाते. पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्यासाठी, जमिनीची धूप कमी करण्यासाठी, सलग समतल चर तयार करणे याची आखणी केली जाते. टेकडीच्या दऱ्या मधून जाणारे पावसाचे पाणी दगडी बांध टाकून अडविले जाते. तसेच शेत जमिनीची माती अति पावसाने वाहून जाऊ नये याकरिता नियोजन करण्यात येते. दुसऱ्या टप्प्यात डोंगराच्या तीव्र उतारावर दहा ते वीस मीटरच्या अंतरावर खासरे पाडून भातशेतीसाठी मजगी आणि पायथ्याशी उंच झाडाचे वृक्षारोपण करण्याबाबत नियोजन करतात. तसेच जैविक बांध टाकण्याचे नियोजन केले जाते. तिसऱ्या टप्प्यात टेकडीच्या पायथ्याशी पाझर तलाव, वन तलाव, गाव तलाव, शेततळे, माती नाला बांध, सिमेंट नाला बांध तसेच रस्ते विकास अंतर्गत सामान्य रस्ता, गाव जोड रस्ते, वाडी जोड रस्ते, पांदन रस्ता इत्यादी विकास कामाची आखणी केली जाते
यात पाणलोट क्षेत्राचे नियोजनकरणे, नदी, तलाव, धरण, बोडी व विहीर पुनर्भरण, फळबाग लागवड, वृक्ष लागवड, कृषी विषयक योजनेवर कृषी सहायक मोरे तसेच सरपंच मनोहर चौधरी यांनी ग्रामस्थांना रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना विषयी माहिती दिली. यावेळी सरपंच मनोहर चौधरी, उपसरपंच राजू झोड, कृषी सहायक खिरडकर, रणदिवे, गाहाणे, ग्रामपंचायत सदस्य नमिता पाटील, पोर्णिमा चौधरी, रामकला मगरे, महादेव शेरकुरे, भारती भोयर, बलराम नागपुरे व समस्त गावकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close